🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jun 18
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
" आगामी निवडणुकीनंतर वेगळे चित्र दिसेल,मात्र पक्ष फुटीची अजिबात चिंता नाही." - शरद पवार यांचे भाकीत आणि आता त्याचे खरे अर्थ. शरद पवार जेव्हा म्हणतात की आगामी निवडणुकी नंतर चित्र वेगळे दिसेल तेव्हा याचा अर्थ शरद पवारांचा पक्ष येत्या निवडणुकीत नेस्तनाबूत झालेला दिसेल असा आहे. आपण उभ्या केलेल्या पक्षाची शकले झाली आणि आपल्या ताब्यात असणारा छोटा गट आपल्या डोळ्यासमोर शून्य होताना बघावे लागणार आहे असा या वाक्याचा अर्र्थ आहे. “पक्ष फुटीची चिंता नाही” याचा अर्थ आधी पक्षाची दोन शकले झाली. छोटा तुकडा माझ्याकडे राहिला. आता निवडणुकीच्या नंतर तो इतका छोटा तुकडा उरेल की त्याच्यात अजून फुट पडणे शक्यच होणार नाही. जसे की आणीबाणीनंतर जनता पक्ष स्थापन केला गेला. त्यात जनसंघ , समाजवादी सगळे लोक सामील झाले. नंतर सगळे जण एक एक करून फुटून गेले आणि आता त्या मूळ जनता पक्षात खासदार सुब्रमण्यम स्वामी वगळता कोणीही नाही. तसे पवारांच्या पक्षात सुद्धा ते सुप्रिया ताई आणि रोहित पवार वगळता कोणीही रहाणार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
येडपट संजय राऊत म्हणतो आहे की अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळून जो दुर्दैवी अपघात झाला त्याबद्दल हवाई वाहतूक मंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा. अरे व्वा !!! एअर इंडिया ही टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे.आता त्या कंपनीत केंद्र सरकारची काही मालकी वगैरे नाही मग केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंवा देशाच्या पंतप्रधानांनी का राजीनामा द्यावा?हा शिवसेनेत मोठा नेता झाल्यावर आणि शिवसेनेतील अनेकांच्या मतानुसार हा शिवसेनेत मोठा नेता झाल्यामुळेच शिवसेनेचे आकाशात भराऱ्या मारणारे विमान कोसळून त्याचे दोन तुकडे झाले.किंबहुना संजय राऊत हाच शिवसेनेच्या फुटीचा आणि अधःपतनाचा जिम्मेदार आहे. त्यामुळेच शिवसेनेतील अनेकांनी याचा राजीनामा मागितला,पण हा पार्श्वभागाला फेविकॉल लावल्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसला आहे. थोडक्यात हा स्वतः आपल्या दुष्कृत्यांची जबाबदारी घेऊन राजीनामा देत नाही, असे असताना हा कुठल्या अधिकारात राजीनामा मागत आहे?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इलेक्ट्रिसिटीच्या वापराचे निर्दोष मोजमाप व्हावे व त्यानुसार ग्राहकाला बिल दिले जावे या उद्देशाने महाराष्ट्रातील विविध शहरांत स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर्स बसवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले गेले असून या नव्या मीटर्सना विरोधही मोठ्या प्रमाणावर होत आहे असे दिसते. मुंबईत अनेक कॉलनीत रहिवाशांची घरगुती वीज वापराची इलेक्ट्रिक मीटर्स गेल्या वर्षभरात बदलण्यात आली आहेत,परंतु मीटर बदलल्यावर वीज बिल अवाच्या सवा जास्त येते अशी तक्रार एकदाही ऐकू आलेली नाही. जिथे हे मीटर लावले गेले तिथे उन्हाळ्यात ए सी,कूलर,पंखे इत्यादी जास्त वापरल्यामुळे जास्त रकमेची बिले आली,पण वाढीव बिले काही अवास्तव जास्त नव्हती.थोडक्यात नवीन मीटर हे अधिक निर्दोष आहे आणि उबाठा सेना याला करत असलेला विरोध राजकीय असल्याने सामान्य नागरिकांनी मात्र वीज खात्याला सहयोग करणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ऑपरेशन सिन्दुर च्या लढाईत तुर्कीये या देशाने पाकिस्तानला उघड उघड पाठिंबा दिला होता.तुर्कीयेमध्ये बनवण्यात आलेले ड्रोन्स व मिसाईल्स देखील पुरवली होती.भारत हे विसरलेला नाही.सायप्रस हा देश म्हणजे भूमध्य सागरातील एक बेट आहे आणि सध्या या बेटाच्या उत्तर पूर्व टोकाचा काही म्हणजे जवळपास २०% भाग तुर्कीये या देशाने बळकावलेला आहे.सायप्रस भेटीमागे पंतप्रधानांचा त्या देशाला तुर्कीयेविरुद्ध संघर्ष झाल्यास सायप्रसला सामरिक शस्त्रे पुरवण्याची भारताची तयारी असल्याचे दर्शविणे हा एक उद्देश असू शकतो.असे करणे म्हणजे तुर्कीये आणि सायप्रस मधील बेटाचा तो भाग तुर्कीयेने सायप्रसला परत करून आपल्या देशात निघून जावे या विषयीच्या वादात सायप्रसची बाजू घेऊन तुर्कीयेने आधी भारताविरुद्ध जी भूमिका घेतली होती तिला दिलेला जबाब आहे.सायप्रस भेटीचे दुसरे कारण म्हणजे सायप्रस देश हा युरोपियन युनियन मधील एक देश आहे.तिथे जर भारताने काही उत्पादने सुरू केली तर यूरोप मधील सर्व देशांत त्यांची विक्री करणे भारतासाठी सुलभ होईल.या करिता पंतप्रधानांच्या सायप्रस भेटीत सायप्रसच्या काही कंपन्यांशी काही भारतीय कंपन्यांचे सामंजस्य करार सुद्धा करण्यात आल्याचे कळते. एकाच भेटीतून तुर्कीये सारख्या विरोधकाला कडक इशारा,भारतीय सैन्य सामग्रीचे मार्केटिंग आणि भारतीय कंपन्यांना युरोपीय बाजारांचे दरवाजे उघडण्यास भारत सरकारतर्फे मदत हे सारे साधण्याचा कसा प्रयत्न करतात याचे पंतप्रधानांची काही तासांची सायप्रस भेट हे चांगले उदाहरण आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र सरकारने काही खूप चांगले निर्णय घोषित केले आहेत. अनिवासी भारतीयांच्या मुलांना आणि पाल्यांना राज्यातील शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश देण्याचा एक अत्यंत उत्तम निर्णय घोषित केला आहे. त्यासाठी लागणारे कायदे बदलले जाणार असून गुणवता आणि आरक्षण या मानकांच्या आधारावरच प्रवेश दिला जाईल असे शासनाने घोषित केले आहे. परंतु या संदर्भात शासनाने फेरविचार करणे आवश्यक आहे. परदेशात रहाणारा भारतीय हा आर्थिक दृष्ट्या संपन्न असतो. परदेशात जातपातहीन वातावरणात ते कुटुंब आणि पाल्य वाढलेला असतो अश्या परिस्थितीत त्याला जातीनिहाय आरक्षणाप्रमाणे प्रवेश देणे ही गोष्ट आरक्षणाच्या मूळ हेतुला हरताळ फासणारी असेल. अश्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला कोणतीही जात असली तरीही ओपन प्रवर्गातून प्रवेश देणे हेच न्यायोचित आणि जातीअंताच्या दिशेने उचललेले पाऊल असेल. महाराष्ट्र शासनाने या निर्णयात ही सुधारणा करणे अत्यंत योग्य असेल.
🔽





留言