top of page

 अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 17
  • 4 min read

 अभिजीत राणे लिहितात

एक काळ असा होता की इराण आणि इस्राइल यांची दोस्ती म्हणजे जय विरूवाली दोस्ती होती आणि सध्या दोघेही एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. इस्राइल देश आकाराला आल्यावर त्याला मान्यता देणारा पहिला मुस्लिम देश इराण होता. इराणी सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे काम इस्रायल करत होता. इराण हा इस्रायलला मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करत होता. परंतु ही दोस्ती इस्लामी क्रांती होऊन खोमेनी सत्तेवर आल्यावर संपुष्टात आली. तेंव्हापासून या दोन्ही देशांमधून विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. भारताला खिळखिळे करण्यासाठी ज्याप्रमाणे पाकिस्तान ऊचापती करतो त्याच ऊचापती इराण पण करतो आहे. इस्रायल च्या विरोधात हमास , हुती , हिजबुल्ला या सगळ्या दहशतवादी गटांना सर्वप्रकारची मदत इराण कडून होत असते. इस्रायल नष्ट करण्यासाठीच इराण अण्वस्त्रे विकसित करतो आहे. त्यामुळेच आत्ता युद्ध पेटले आहे. जर खोमेनी यांची राजवट नष्ट झाली तर कदाचित इस्रायल आणि इराण संबंध पूर्ववत होतील. कारण या दोन देशांमध्ये तसे संघर्ष होण्याचे कारण नाही. दोघांच्या सीमा एकमेकांच्या पासून खूप दूर आहेत आणि सैद्धांनिक पातळीवर इस्रायलचे अस्तित्व समस्त अरब जगताने मान्य केलेच आहे. त्यामुळे आता तो संघर्षाचा मुद्दा असू शकत नाही.

 अभिजीत राणे लिहितात

नरेंद्र मोदी पक्के बनिया आहेत याचे हे एक उदाहरण. मेक इन इंडिया अंतर्गत भारत आता स्वतःचे तेलवाहू टँकर्स निर्माण करण्याच्या दृष्टीने १० बिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक करणार आहे याचे कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी अंदमानजवळ भारताला १ लाख ८५ हजार कोटी लिटर (ज्याची किंमत २० ट्रिलियन डॉलर्स होईल) एवढा कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे. भविष्यातील वाढीव तेल वाहतुकीचं नियोजन आधी करून मगच मोदी सरकारने तेलाचा हा जॅकपॉट लागल्याची घोषणा केली आहे. हे उत्खनन होईपर्यंत या योजनेचा अजून एक लाभ आहे. तेलाची आयात-निर्यात करत असताना परदेशी कंपन्यांचे तेलवाहू टँकर्स वापरण्यासाठी भारताला दरवर्षी ७५ बिलियन डॉलर्स एवढं भाडं मोजावं लागतं, ते वाचवणं आणि आत्मनिर्भर बनणं हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर जागतिक वाहतुकीच्या तुलनेत भारताची क्षमता सध्या केवळ २% टन क्रूड ऑइल वाहतूक करण्याची आहे, ती वाढवणे आणि भारतात केवळ ५% तेलवाहू टँकर्स बनतात ती क्षमता टप्प्याटप्प्याने ६९% एवढी करणे हे उद्दिष्ट भारताने ठेवलं आहे. आकडेवारीच्या हिशेबात सांगायचं तर भारत आता पूर्ण क्षमतेचे ११२ नवे तेलवाहू टँकर्स बनवणार आहे. थोडक्यात सगळी तयारी करून मगच मुख्य कामाला मोदी हात घालतात आणि हा अस्सल बनियाचा गुण आहे.

 अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्र भाजपाचे नेमके काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. सुधाकर बडगुजर हे नाशिक मधील एक वादग्रस्त नेते. सध्या ते उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे 17 गुन्हे नोंदवले गेले आहेत. इतकेच नाही तर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर त्यांनी पार्टी केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने नाशिक मधील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना लाथाडून सीमा हीरे यांना निवडणून आणले होते. असा पडेल , गुन्हेगार उमेदवार भाजपा मध्ये घेऊन भाजपा महाराष्ट्राचे नेमके कोणते हित साधणार आहे ? असा प्रश्न नाशिक मध्ये प्रत्येकाला पडला आहे. भाजपामध्ये एकाही वादग्रस्त, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला थारा दिला जाणार नाही या आपल्या घोषणेचा चन्द्रशेखर बावनकुळे यांना सोईस्कर विसर पडला आहे. देवेंद्रजींचे संकटमोचक हनुमान गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून बडगुजर यांच्या प्रवेशासाठी स्थानिक नेत्यांना राजी केले आहे. परंतु यामुळे भाजपाची प्रतिमा डागाळणार आहे यात संशय नाही. महाराष्ट्रात तरी भाजपाची अवस्था पार्टी विथ नो डिफरन्स अशीच झाली आहे.

 अभिजीत राणे लिहितात

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि मनोज जरांगे पाटील या दोघांचेही एका सकारात्मक कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आता कॉलेज सुरू होत आहेत आणि विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. कारण या प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांना फीमध्ये सवलत किंवा फी माफी मिळू शकते. परंतु महाराष्ट्रातील समाज कल्याण खात्याची अधिकारी मंडळी यात जाणीवपूर्वक दिरंगाई करत होती आणि तशी तक्रार जरांगे पाटील यांच्याकडे आली त्यांनी सामाजिक न्याय मंत्र्‍यांना संपर्क केला. संजय शिरसाट यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी आदेश काढला आहे की यापुढे समाज कल्याण खात्याच्या अधिकार्‍यांनी जात पडताळणी अर्ज तातडीने हातवेगळे करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये प्रवेश घेताना कोणतीही अडचण येणार नाही. प्रशासकीय दिरंगाई आणि त्याचा सामान्य नागरिकांना बसणारा फटका यावर कायमच चर्चा होते. परंतु एका आंदोलक नेत्याची भेट घेऊन त्यांच्या रास्त मागणीवर तातडीने कारवाई करण्याची घोषणा करणे हा एक चांगला पायंडा या निमित्ताने निर्माण झाला.

 अभिजीत राणे लिहितात

अजित पवारांना मिडिया खूप चुकीच्या पद्धतीने वादग्रस्त बनवतो आहे. काहीही गरज नसताना त्यांच्या वक्तव्याला जाणीवपूर्वक ट्विस्ट करून मिडिया आग पेटवतो आहे. हा मीडियाचा खोडसाळपणा आहे आणि याचा निषेध करावा तितके कमी. वास्तविक अजित पवार यांचे वक्तव्य अत्यंत प्रेरणादायी होते. अजित दादा काय म्हणाले ? “कुठलेही काम करणे कमीपणाचे वाटून घेऊ नका. पेट्रोलपंपावर पेट्रोल सोडण्याचे काम करणे यात काहीही कमीपणा नाही. धिरूबाई अंबानी यांनी सुद्धा पेट्रोल सोडण्याचे काम केले आहे. नंतर ते कोट्याधीश झाले.” या वाक्यात काहीही चुकीचे नाही. मीडियाचा हा निचपणा आहे की “धिरूबाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्याधीश झाले.” असे अर्धवट वाक्य प्रसारित करून त्यांनी अजित पवार अंबानी यांचा अपमान करत आहेत असे त्यांनी नॅरेटीव्ह निर्माण करण्याचा प्रयास केला. महाराष्ट्रातील मिडिया हा शरद पवारांची बटिक आहे हे जागतिक सत्य आहे आणि हे लोक जाणीवपूर्वक महायुतीच्या नेत्यांबद्दल खोट्या आणि खोडसाळ बातम्या चालवतात. यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांना तुरुंगात धाडल्याशिवाय यांचे हे धंदे थांबणार नाहीत.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page