top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 15
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इराण आणि इस्रायल युद्धाचे कोणते परिणाम संभवतात याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे कारण आताच सोने एक लाखाच्या पुढे गेले आहे. इराणने अमेरिकेच्या आखातातील सैन्य ठिकाण्यावर हल्ला केला तर अमेरिका या युद्धात ओढली जाईल आणि अमेरिका उतरली तर कदाचित रशिया किंवा चीन सुद्धा थेट उतरतील आणि मग हे जागतिक युद्ध होईल. आखाती देश यात उतरले किंवा इराणने क्रूड ऑइल च्या जहाजांवर हल्ला केला तर जगभरातील तेलाच्या किमती भडकतील आणि रशियाचा मोठा लाभ होईल. इराणची आण्विक क्षमता पूर्ण नष्ट झाली नाही आणि त्यांनी माथेफिरूपणा केला तर जगाला मोठी किंमत चुकवावी लागेल. जगातील अर्थ व्यवस्था विस्कळीत झाली तर छोट्या राष्ट्रांची अवस्था दयनीय होईल. दुसरीकडे इराण मध्ये सत्तांतराचा प्रयास झाला आणि तो फसला तर इराणची अवस्था इराक , सिरिया , येमेन किंवा लिबिया सारखी होऊ शकते आणि आयसीस सारखी आणखी एखादी दहशतवादी शक्ति निर्माण होऊ शकते. त्यामुळे इराणवर हल्ला करून इस्रायलने एका चेन रिएक्शनला जन्म दिला आहे यातून प्रचंड नरसंहार संभवतो. प्रार्थना करणे याच्या पलीकडे सामान्य नागरिकांच्या हातात काहीच नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इराण आणि इस्रायल संघर्ष पेटला आहे. इस्रायल ने इराणची एयर डिफेंस सिस्टिम उध्वस्त करून त्यांच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले करून त्यांना उध्वस्त केले. प्रत्युत्तरादाखल इराणने सुद्धा अत्यंत घातक असा प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा , अमेरिकेची एयर डिफेंस सिस्टिम , जॉर्डनची एयर डिफेंस सिस्टिम आणि दहा देशांची विमाने कामाला जुंपली गेली आणि तरीही इराणच्या काही क्षेपणास्त्रांनी इस्रायल च्या तेलअविव या राजधानीवर हल्ला करून काही इमारती उध्वस्त करण्यात यश मिळवले. ऑपरेशन सिंदूर भारताने एकट्याने लढले. पाकिस्तानने सुद्धा असाच क्षेपणास्त्र मारा केला होता परंतु एस -400 , आकाश आणि भारताची गुप्त अशी लेजर सुचालित एयर डिफेंस सिस्टिम वापरुन आपण पाकिस्तानची 100 % क्षेपणास्त्रे हवेतच उध्वस्त करण्यात यश मिळवले. ऑपरेशन सिंदूर नंतर जगातील प्रत्येक देश भारताच्या विरोधात का उभा राहिला याचे हे उत्तर आहे. आपण जी तांत्रिक क्षमता दाखवली आहे ती अमेरिकेला आणि इस्रायलला सुद्धा साधलेली नाही. आणि या यशाचे श्रेय निःसंशयपणे मोदींना जाते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लोकलने प्रवास करणार्‍या मुंब्रा दिवा येथील पाच प्रवाशांना मागील आठवड्यात आपला जीव गमवावा लागला. गर्दीच्या वेळी प्रवाशांना अनेकदा लटकत प्रवास करावा लागतो. यातूनच दिवसाला ७ ते ८ प्रवासी मृत्युमुखी पडतात. यामुळे समस्त प्रवासी व्यथित आणि संतप्त झाले होते. सामान्य नागरिकांच्या रोषाची कल्पना आल्याने स्थानिक नेते आणि रेल्वे प्रशासन यांनी या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना काय करता येईल यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये उपनगरीय रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. प्रवाशांना असणाऱ्या अपुऱ्या सुविधा, सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, वेळापत्रकातील विस्कळीतपणा, गर्दीचे नियोजन, मंजूर प्रकल्प बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून होणारी हेळसांड यावर व्यावहारिक व सर्वसमावेशक सूचना मांडण्यात आल्या. या चर्चेमधून तयार होणाऱ्या ठोस मागण्या लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे सादर केल्या जाणार आहेत. उशिरा का होईना लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासन यांना सामान्य नागरिकांच्या यातनांची जाणीव झाली हे ही नसे थोडके.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सरकारी प्रकल्प पूर्ण झाले की बर्‍याचदा मंत्रीमहोदयांना उद्घाटन करायला वेळ नाही म्हणून तसेच प्रलंबित ठेवले जातात आणि मंत्रीमहोदयांना सवड झाली की त्या प्रकल्पाचे लोकार्पण होते, या कोंग्रेसी परंपरेला देवेंद्रजी फडणवीस यांनी संपवले आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते, मार्गिकेवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा, रंगकाम आणि मार्ग रेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी उपलब्‍ध झाला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. आणखी एक लोकाभिमुख निर्णय घेतल्याबद्दल देवेन्द्रजींचे अभिनंदन

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आर्थिक अडचणींमुळे परदेशात जाऊ न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात जागतिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. पाच ख्यातनाम आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी 'लेटर ऑफ इंटेंट' (उद्दिष्टपत्र) देण्यात आले असून लवकरच ही विद्यापीठे मुंबईत कार्यान्वित होतील, यामुळे मुंबईचा ठसा जागतिक शैक्षणिक नकाशावर उमटणार आहे. स्कॉटलंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅबर्डीनला 500 वर्षांचा समृद्ध शैक्षणिक वारसा लाभलेला असून इंग्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क संशोधन व व्यापक ज्ञानशाखांतील शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता क्षेत्रातील अग्रणी संस्था असून द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे खाणउद्योग, जीवनशास्त्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण संशोधनात विशेष योगदान आहे. मिलान येथील इस्तितूतो युरोपिओ दी डिझाईन इटालियन डिझाईनची अभिजातता व सर्जनशीलता भारतीय भूमीत घेऊन येणार आहे. या अफलातून योजनेचे जनक आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. त्यांच्यामुळे या विश्वविख्यात विद्यापीठांमध्ये आणि ते पण मुंबईत राहून शिकण्याची सुसंधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. द्रष्टे नेते देवेंद्रजी यांचे हार्दिक आभार.

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page