🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jun 15
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एयर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या विमानाच्या अपघाताच्या निमित्ताने भाग्यांक आणि मृत्युची तारीख एकच आल्याचा दुर्दैवी योगायोग बघायला मिळाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा खाजगी कामाच्या निमित्ताने या विमानाने लंडनला जायला निघाले होते. त्यांचा सुद्धा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. विजय रुपाणी हे अत्यंत आध्यात्मिक होते आणि त्यांना 1206 हा क्रमांक कायमच लकी ठरलेला होता. ते या अंकाला आपला भाग्यांक मानत असत. त्यामुळे त्यांनी आयुष्यात घेतलेल्या पहिल्या स्कूटरपासून ते सर्व मोटार गाड्यांपर्यंत त्यांनी १२०६ हा नंबर कायम ठेवला होता. विमान अपघाताची दुर्दैवी घटना सुद्धा 12 जून अर्थात 1206 याच तारखेला झाली आणि आकड्याच्या दिवशी त्यांचे निधन होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. नियतीचे खेळ मानवाला कधीच कळत नाहीत आणि मानव हा या जगतात पराधीन आहे हेच खरे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ढिसाळ कायदे दिव्याखाली अंधार, उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणायची वेळ समस्त गोरक्षक मंडळींवर आली आहे. महाराष्ट्र शासनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी देशी गायींना ‘राज्यमाता’ म्हणून सन्मानित केले आणि आता दरवर्षी २२ जुलै हा ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ अर्थात ‘गोमाता दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण करण्यासाठी त्यांची उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे सगळे सरकारी पातळीवर घडते आहे. परंतु जमीनीवरील वास्तव भयावह आहे. गाय पोसणे परवडत नाही , गोर्ह्याचा काही उपयोग नाही त्यामुळे शेतकरी कायद्याने बंदी असूनही गोवंश कसायांना विकतो, त्याला थोपवणे कुणालाही शक्य नाही. कसाई मंडळी पोलिसांना आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरून गोवंश हत्या करणे थांबवत नाहीत. गोवंश वहातूक होत असताना गोरक्षक मंडळी जिवावर उदार होऊन या कसायांच्या गाड्या थांबवतात आणि पोलिस मात्र गोरक्षक मंडळींवरच गुन्हे दाखल करतात हे महाराष्ट्रातील सार्वत्रिक चित्र आहे. त्यामुळे सरकारने असे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी भाकड गायी चांगला दर देऊन विकत घेण्यासाठी गोशाळांना निधी देण्यास सुरुवात केली तर गोशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील त्याच दुर्मिळ वंशांचे संरक्षण करण्याचे काम करू शकतील आणि शासनाला या प्रचारकी उपद्व्यापांची गरजच पडणार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शनीच्या कृपेने प्रसिद्ध असलेले घराला दारे नसणारे गाव शनि शिंगणापुरमध्ये एक वेगळेच आंदोलन पेटले आहे. इथल्या शनि मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी मंडळींचे आर्थिक हितसंबंध मुस्लिम कंत्राटदार मंडळींशी असल्याने देवाच्या चौथर्याचे काम मुस्लिमांना दिले जाते. मंदिर प्रशासनाच्या सेवेत तब्बल 114 मुस्लिम कर्मचारी असल्याचे उघड झाले. याविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांनी दंड थोपटल्याने त्यांनी मुस्लिम कर्मचारी काढलेच जोडीला त्यांनी 50 हिंदू कर्मचारी पण हाकलून देत सर्वधर्मसमभावची प्रचिती दिली. एकेकाळी या मंदिरात प्रवेश मुक्त होता. हातपाय धुवा शनीच्या चौथर्यावर तेल आणि उडीद अर्पण करा. एक प्रदक्षिणा घातली की झाले दर्शन. गेले काही दिवस इथे पैशाचा बाजार मांडला गेला आहे. चौथर्यावर जायचे असेल तर विशिष्ट वस्त्रच हवे , आणि अनेक नियम बनवले गेले आहेत ज्यांचा कोणत्याही अर्थाने पारंपरिक दर्शनाशी संबंध नही. या सगळ्याचे लाभार्थी मुस्लिम होते आणि पडद्याआडून मंदिर समिती पण पैसे छापत होती हे उघड सत्य होते. परंतु आता हिंदुत्ववादी संघटना आंदोलनाच्या भूमिकेत उतरल्याने या सगळ्याच गोष्टी उघड होत आहे. या आंदोलनाचा होईल तो परिणाम होईल परंतु या निमित्ताने हिंदूंची मंदिरे हिंदुत्ववाद्यांच्या हातात असावी आणि राजकीय नेत्यांना तिथे स्थान नसावे हा मुद्दा परत एकदा अधोरेखित होत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दिव्यांग नागरिकांच्या हितार्थ काम करण्यासाठी सुप्रसिद्ध असणार्या बच्चू कडू यांनी यावेळी शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना काल चन्द्रशेखर बावनकुळे जाऊन भेटून आले आणि त्यांच्या मागण्यांचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल असे आश्वासन दिले. बच्चू कडू हे शिवसेनेचे कार्यकर्ते. दिव्यांग बांधवांसाठी ते कायमच लढले आहेत. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील घटना आहे. मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना सायकल पुरवण्याचे वचन दिले आणि नंतर त्यांनी माघार घेतली. बच्चू कडू यांनी आपल्या सासर्याला लग्नात या सायकलीच हुंडा म्हणून द्या अशी मागणी केली आणि दिव्यांग बांधवांना सायकल प्रदान केल्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळे आज ते आमदार नाहीत. परंतु त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा विचार करणे आवश्यक आहे. शेतकरी हितासाठी उपोषण करण्यात काहीच गैर नाही परंतु आपल्या व्यासपीठावर टीकेत सारखे सुपारिबाज , आंदोलनजीवी आणि राष्ट्रहिताला नख लावणारी मंडळी फिरकणार नाहीत याची त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्य चालवणे हा सर्वात महत्वाचा गुण प्रत्येक राज्यकर्त्यामध्ये असणे अत्यंत आवश्यक असतो. देवेंद्रजी नेमके त्याच पद्धतीने काम करताना दिसतात आणि हे त्यांचे वेगळेपण आजवरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देते. शीख धर्मगुरु श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांचा 350 वा शहिद समागम आणि गुरुगोविंद सिंग जी यांचा 350 वा गुरु ता गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात तीन ठिकाणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नांदेड येथे 15 व 16 नोव्हेंबर, नागपूर येथे 6 डिसेंबर, नवी मुंबई येथे 21 व 22 डिसेंबर 2025 दरम्यान शासनाच्या सक्रिय सहभागाने समागमाचे आयोजन केले जाणार आहे. शीख समाज महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात नाही परंतु शिखांचे धर्मरक्षणाचे कार्य विसरणे अशक्य आहे. संघर्षाच्या काळात समाजाचे शोषण होत असताना गुरु तेग बहादूर यांनी समाजासाठी समर्पण केले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी लढा दिला. समाजासाठी ते शहीद झाले, हा इतिहास पुढील पिढीला कळणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेन्द्रजींचे अभिनंदन.
🔽
Comments