🖋️ अभिजीत राणे लिहितात
उद्धव ठाकरे सेनेचे चालते बोलते मुखपत्र संजय राऊत हे दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या बद्दल वडिलांच्या प्रमाणे आदर वाटतो असे म्हणाले होते. आज मात्र ते पवारांवर टीकेचे आसूड ओढत आहेत.सातत्याने या बोटावरील थुंकी त्या बोटांवर करण्याच्या अश्या उद्योगांमुळे संजय राऊत हास्यास्पद होत आहेत आणि त्यांचे त्यांनाच समजत नाही. नरेंद्र मोदींनी पवारांसाठी खुर्ची ओढली. त्यांच्या ग्लास मध्ये पाणी भरले त्यावेळी संजय राऊत यांच्या मते पवारांची उंचीच तितकी मोठी आहे की पंतप्रधानाने नतमस्तक व्हावे. आता त्याच साहित्य संमेलनात पूर्वाश्रमीच्या एकसंध शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषद अध्यक्षा, महिला आघाडी प्रमुख डॉक्टर मीनल गोऱ्हे यांनी आम्ही कसे घडलो या मुलाखतीत एक खळबळजनक दावा केला होता. शिवसेनेत दोन मर्सिडीज घेऊन दिल्या की हवे ते पद मिळत असे. अर्थातच त्यांच्या टीकेचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. मीनलताई सध्या शिंदे सेनेत आहेत आणि त्यांनी अश्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संजय राऊत संतापले. राजकीय भाष्य करण्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ प्रदान करणे ही शरद पवार यांची चूक असून त्याला तेच जबाबदार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अँटी क्लायमॅक्स घटनाक्रम थांबण्याचे नाव घेत नाहीत. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी जी गाडी वापरली ती गाडी बालाजी तांदळे यांच्या मालकीची असून, तांदळे यांना बरोबर घेऊनच पोलीस तपास करण्यासाठी सगळीकडे फिरत होते. पोलिसांनी खाजगी गाडी वापरण्यात काहीही गैर नाही परंतु यातील धक्कादायक बाब म्हणजे तांदळे हे वाल्मिक कराड यांचे अत्यंत नजीकचे असल्याचे उघड झाले आहे. वाल्मिक कराड यांच्यावर आधी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता आता त्यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात खुनात सहभाग असल्याचा गुन्हा सुद्धा नोंदवला गेला आहे. याचा अर्थ असा होतो की बीडचे पोलीस ज्या व्यक्तीवर खुनाचा आरोप आहे त्याच्या नजीकच्या सहकाऱ्याला घेऊनच खुन्यांचा शोध करत होते. अर्थात तांदळे यांनीच कराड यांच्या मार्फत आरोपींना आम्ही कुठे कुठे येणार आहोत हे सांगितले असणे आणि त्यामुळे आरोपींनी पळ काढला असणे शक्यच आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष काम केलेले नाही आणि हे वारंवार उघड होते आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
साम्यवादी मंडळींच्या कडून तत्वनिष्ठा हा विषय खरच शिकण्याजोगा असतो. सर्वसमावेशकता हा संघाचा संस्कार आहे. भाजप याचे पालन करताना दिसते. परंतु कम्युनिस्ट मंडळी अत्यंत दीर्घद्वेषी असतात. महाराष्ट्र साहित्य परिषद हा साम्यवादी आणि पुरोगामी मंडळींचा अड्डा आहे. यावेळेसचे संमेलन दिल्लीला होणार होते. साम्यवाद्यांनी स्वागताध्यक्ष पद शरद पवारांच्या कडे दिले आणि संमेलनाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत असाच भ्रम निर्माण केला. संमेलनाचे आमंत्रण नरेंद्र मोदींना देणे इथपासून महाराष्ट्र सरकारशी समन्वय ठेवण्याचे काम सुद्धा पवारांनी केले. शेवटच्या क्षणी संमेलनाध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर ही कट्टर कम्युनिस्ट आणि लोकसाहित्यातील तज्ञ विदुषी आहेत हे उघड झाले. अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी नाव घेऊन, जाणता राजा असे विशेषण देऊन शरद पवारांवर स्तुती सुमने उधळली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा त्यांनी उल्लेखच केला नाही. त्यांनी फक्त त्यांच्या पदाचा उल्लेख केला. गम्मत अशी की घटना घडून दोन दिवस होऊन गेले आहेत केंद्रीय भाजप आणि प्रदेश भाजप यांना या घटनेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे सुद्धा सुचलेले नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उद्धव ठाकरे आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलीन्स्की यांच्यात अफाट साम्य आहे. शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अमेरिकेन डीप स्टेट मुळे झेलीन्स्की राष्ट्रपती झाले. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या विनोदी स्वभावाची महाराष्ट्राला ओळख झाली, झेलीन्स्की स्टँडअपकॉमेडीयन म्हणून प्रसिद्ध होते. दोघेही सत्तारूढ असताना केलेल्या विनोदी वक्तव्यांनी जगप्रसिद्ध आहेत. युक्रेनच्या शत्रू असलेल्या रशियाला मदत करून डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा देण्याची वेळ आणली आहे. पवारांनी शिंदेंचे बंड ज्ञात असूनही भाजपला मदत करून ठाकरे यांना राजीनामा देण्याची वेळ आणली होती. आपले आमदार सोडून गेले आहेत हे माहिती असतानाही उद्धव ठाकरे त्यांनी माझ्या समोर येऊन मला सांगावे की त्यांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे मी लगेच राजीनामा देतो अशी हास्यास्पद बडबड करत होते. अमेरिकेने युक्रेनला नाटोचे सदस्य करावे मी तत्काळ राजीनामा देतो अशी हास्यास्पद बडबड झेलेन्स्की करत आहेत. थोडक्यात काय ? परक्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन मोठी उडी मारणारे लोक समर्थन काढले की जमिनीवर आदळतात.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र शासन ही संस्था खतरों के खिलाडी आहे याची कल्पनाच नव्हती. आजवर जे धाडस कोणत्याही नवऱ्याने केले नसेल ते धाडस महाराष्ट्र करत आहे. सामान्यतः नवरे बायकोला घेऊन साडी घेण्यास गेले. तर त्यांना चार दुकाने आणि कमीत कमी २०० साड्यांना बघून छान , सुंदर , हीच घे यापेक्षा अधिक एकही शब्द बोलण्याची मुभा नसते. बायका एक साडी घेण्यासाठी एक दिवस खर्च करतात आणि खतरों के खिलाडी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना होळीच्या निमित्ताने रेशन दुकानांवर साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला शंभर टक्के खात्री आहे हा निर्णय घेणारा मंत्री आणि त्याच्या खात्याचा सचिव दोघेही नक्कीच अविवाहित असणार. बायकांना स्वतः घेतलेली साडी कधी नीट पसंत पडत नाही आणि शासनाने कोट्यावधी बहिणींच्या साठी म्हणून घेतलेल्या घाऊक साड्या पसंत पडतील हे कसे शक्य आहे ? जुन्या काळात जसे मांजरपाट आणला की घरातील मुलांचे आणि वडिलांचे कपडे त्यात होत असत. सगळे सारख्याच कपड्यात दिसत असत. हा तोच प्रकार होईल आणि महाराष्ट्रभर होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील कमीत कमी ४० ते ५० % कदाचित जास्त स्त्रिया तुम्हाला एकाच दिवशी एकाच प्रकारच्या साडीत दिसू शकतात. थोडक्यात नवरात्रीच्या जोडीला आता एकाच रंगाच्या , एकाच पोताच्या साड्या तुम्हाला होळीच्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रात दिसणार आहेत.
🔽
Comments