top of page

 अभिजीत राणे लिहितात

dhadakkamgarunion0

 अभिजीत राणे लिहितात

विरोधी पक्षनेता कसा नसावा याची जागतिक पातळीवर स्पर्धा झाली तर राहुल गांधींचा क्रमांक पहिला येईल. न्यायालय, प्रशासन आणि राजकीय नेतृत्व ही लोकशाहीची तीन अंगे आहेत. प्रत्येकाचे सार्वभौमत्व कायम राहिले तर आणि तरच लोकशाही तग धरू शकते. दुर्दैवाने हा महत्वाचा मुद्दाच जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचा राहुल गांधी होतो. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करायची होती. आजवरच्या परंपरेला अनुसरून हे कार्य राष्ट्रपती , पंतप्रधान आणि मुख्य विरोधी पक्षनेता असे तिघे मिळून करतात. यावेळी राहुल गांधी यांनी या नेमणुकीत आपण सरन्यायाधीशांना समाविष्ट करा अशी मागणी केली. परंतु हा प्रशासकीय व्यवस्थेत न्यायिक यंत्रणेचा हस्तक्षेप झाला असता आणि त्यामुळे या मागणीला सरकारने विरोध केला. या संदर्भात राहुल गांधींच्याच एका पित्त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. न्यायालयाला या मुद्द्यात रस असणे स्वाभाविक आहे कारण यामुळे न्यायालयांच्या अधिकारांची व्याप्ती वाढते. परंतु यामुळे सरकार आणि प्रशासन यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान निर्माण होते त्यामुळे सरकारने मध्यरात्रीच निर्णय घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त पदावर ज्ञानेशकुमार यांची नेमणूक केली. संतापलेल्या राहुल गांधी यांनी तमाशा सुरु केला आहे आणि आपला मिडिया त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे.

 अभिजीत राणे लिहितात

“टेस्ला येणार रे !!”एलॉन मस्क यांची टेस्ला ही विद्युत चलित कार लवकरच भारतात उत्पादित होऊन भारतीय रस्त्यांवरून धावू लागणार आहे. टेस्ला कार एका चार्जिंग मध्ये तब्बल ५५० किलोमीटर ची रपेट मारू शकते. आयातीत वस्तूंवरील भारतातील करप्रणाली अत्यंत जाचक असल्याने आजवर टेस्ला भारतीय बाजारपेठेत येऊ शकत नव्हती परंतु सरकारने काही कायदे बदलले आहेत. ५० कोटी डॉलर्सची देशांतर्गत गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला भारतात आता प्रवेश करण्याची परवानगी आहे. त्याच प्रमाणे ३५ लाखांवरील किमतीच्या आयातीत गाड्यांसाठी असणारा ११० % कर आता ७० % केल्याने टेस्ला भारतीय बाजारात तत्काळ प्रवेश करू शकेल. मोदींचा दौरा संपतो न संपतो तोच टेस्ला ने भारतात १३ पदांवरील अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा निर्णय घेतला असून त्यासाठी लिंक्ड इन या वेबसाईट वर जाहिरात सुध्दा टाकली आहे. टेस्ला भारतीय बाजारात आल्यावर देशांतर्गत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आपला दर्जा सुधारण्याचे आणि किफायती किंमतीत विद्युत कार विकण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे परंतु यात अंतिम लाभ हा सामान्य ग्राहकाचाच होणार आहे. त्यांना जागतिक पातळीवरील दर्जेदार कार किफायतशीर दरात उपलब्ध होईल.

 अभिजीत राणे लिहितात

उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही शिव्यासेना झाली आहे अश्या कठोर शब्दात एकनाथ शिंदे यांनी तोफ डागली आहे. बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते होते परंतु तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. सामान्यातील सामान्य शिवसैनिक हा माझा सहकारी आहे असे बाळासाहेब म्हणत असत हे नाते तुम्ही मालक आणि नोकर या पातळीवर आणून ठेवले ही तुमची चूक आहे असे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बोलून दाखवले. उद्धव ठाकरे यांनी आमच्या अनेक आमदारांना फोन करून मालकासह रहाणार का नोकराकडे जाणार ? अश्या विखारी शब्दात उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींचा अपमान केला त्यामुळे आमदार संतप्त होऊन त्यांना सोडून गेले. आपल्या या उर्मट वर्तनाचे आत्मपरीक्षण न करता उद्धव ठाकरे अजून जास्त उर्मट आणि शिवराळ भाषेचा वापर करत आहेत हे लज्जास्पद आहे. महादजी शिंद्यांच्या वंशजांनी माझा सत्कार केला हा महाराष्ट्राचा सत्कार होता हा बाळासाहेबांच्या विचारांचा सत्कार होता परंतु या कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका बघता आता ते शिव्यासेना या पक्षाचे नेते आहेत असेच म्हणावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्या या टीकेचा उद्धवजींवर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नसून त्यांनी परवाच राष्ट्रींय स्वयंसेवक संघाला वाळवी असा शेलका आहेर प्रदान केला आहे.

 अभिजीत राणे लिहितात

एखादी बातमी कशी फिरवून सांगावी यात आपल्या मिडीयाला कोणीच मात देऊ शकत नाही. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमेरिकन डीप स्टेट आणि जॉर्ज सोरोस यांनी नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. यासाठी ईंडी आघाडीला मदत करावी लागणार होती. म्हणून यु एस एड या संस्थेने भारतातील मतदारांनी भरघोस मदत करावी म्हणून तब्बल दोन कोटी डॉलर्स चा निधी खर्च करण्याची अनुमती मिळविली. हा निधी अर्थातच ईंडी आघाडीचे पोसलेले पत्रकार , विचारवंत ईंडी आघाडी यांना प्रदान केला गेला पण दाखवताना तो मतदारांच्या प्रबोधनासाठी खर्च होत असल्याची मखलाशी केली. इतके पैसे खर्च करूनही ईंडी आघाडी आडवी झालीच पण त्यांनी मोदींना विक्रमी बहुमत मिळण्यापासून रोखले हे मात्र सत्य आहे. आता वास्तवात हा भ्रष्टाचार आहे. परंतु ही बातमी आपला मिडिया कशी देतो आहे ? डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की भारत हा श्रीमंत देश आहे. जगात सर्वात जास्त करसंकलन भारतात होते त्यामुळे भारतातील निवडणुकीसाठी अमेरिकेने निधी देण्याची गरज नाही म्हणून आम्ही हा दोन कोटी डॉलर्स चा निधी थांबवतो आहोत. थोडक्यात ही बातमी “ ट्रम्प यांचा मोदींना दणका” या पद्धतीने आपला मिडिया छापत आहे. आणि सत्य हे आहे की ट्रम्प यांनी ईंडी आघाडीला आणि मोदी विरोधी तत्वांना मिळणारा निधी बंद करून त्यांनाच दणका दिला आहे.

 अभिजीत राणे लिहितात

भारतातील राजकारणी मंडळींच्या उड्या मारण्याच्या प्रवृत्तीला बघून बेडूक सुद्धा लाजेल अशी परिस्थिती आहे. सत्ता , सत्ता आणि सत्ता यापलीकडे बघण्याची बौद्धिक कुवत ज्याच्यामध्ये नाही तो राजकारणी अशी व्याख्या आता समाजात रूढ झाली आहे. राजकारणी म्हणजे सत्तापिपासू व्यक्ती हे वारंवार सिद्ध होते. या सिद्धांताची पुष्टी देणारे एक प्रकरण महाराष्ट्रात नुकतेच घडले आहे. गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक यांनी भाजपकडून तिकीट मिळत नाही हे नक्की झाल्यावर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. त्यांच्यासह ३० नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पवार गटात प्रवेश केला. मंदा म्हात्रे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. पराभूत झाले आणि आता त्यांना स्वगृही येण्याचे वेध लागले आहेत. काल पहिल्या टप्प्यात ३० नगरसेवक भाजपवासी झाले आहेत. संजीव नाईक सुद्धा वाटेवर आहेत. या पक्षप्रवेशाला भाजपच्या जुन्या निष्ठावंत मंडळींनी कडाडून विरोध केला होता परंतु राज्य पातळीवरील नेतृत्वाने या विरोधाला न जुमानता हा पक्षप्रवेश घडवला आहे. नेहमीप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे हा निर्णय घ्यावा लागला अशी मखलाशी केली गेली आहे.







 
 
 

Commentaires


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page