अभिजीत राणे लिहितात
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जगभरातील डाव्या विचारसरणीच्या लोकांवर टीकेची तोफ डागली आहे. जॉर्जिया , मोदी आणि ट्रम्प हे स्वतःच्या देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे उजव्या विचारसरणीचे नेते हे लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे जागतिक पातळीवर चित्र निर्माण करण्यात आले. हे चित्र निर्माण करण्यात जगभरातील डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता. राष्ट्रहित सर्वतोपरी ही संकल्पना अत्यंत योग्यच आहे. प्रत्येक राष्ट्राने स्वतःच्या हितांना प्राधान्य दिले तर त्याला त्याच्या देशातील नागरिकांना सुखी ठेवणे शक्य होईल आणि यातूनच खरी जागतिक शांतता निर्माण होईल. परंतु डाव्या विचारवंतांना आपल्या देशातील नागरिकांना उपाशी ठेवून जगभर उचापती करण्यात अधिक रस असतो. जो बायडन यांनी अमेरिकेला कर्जबाजारी करत युक्रेन युद्ध रेटले. परंतु युक्रेन युद्धाचा आणि सामान्य करदात्या अमेरिकन नागरिकांचा अर्थाअर्थी संबंध नव्हता केवळ डावी विचारसरणी आणि जगाचा फौजदार म्हणून मिरवण्याची हौस म्हणून बायडन यांनी युक्रेनला मदत केली. जागतिक पातळीवर होत असलेले हे वैचारिक परिवर्तन जागतिक शांततेसाठी निर्णायक सिद्ध होऊ शकेल.
अभिजीत राणे लिहितात
कसबा पेठेतील कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्षाला जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा रंगली आहे. धंगेकर मुळचे मनसेचे नेते, त्यांना भाजपात येण्याची इच्छा होती परंतु गिरीश बापट यांनी त्यांचा मार्ग अवरुद्ध केला. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठेतील जागेवर धंगेकर यांनी पोट निवडणूक जिंकून “ हु इज धंगेकर ? ” या चंद्रकांत पाटलांच्या उर्मट प्रश्नाचे योग्य उत्तर दिले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले त्यात धंगेकर पण टिकाव धरू शकले नाहीत. सत्तेपासून दूर राहून काम करणे सध्या सगळ्याच नेत्यांना कठीण होते आहे त्यामुळे धंगेकर यांनी वेगळा विचार सुरु केला असणे अगदीच शक्य आहे. त्यांनी गुरुवारी मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही उपस्थित होते. रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची वर्तवली जात आहे. रवींद्र धंगेकर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. कार्यसम्राट नगरसेवक , कार्यसम्राट आमदार अशी ख्याती असणाऱ्या धंगेकर यांचा हा निर्णय शिवसेनेचे पुण्यातील बळ वाढवणारा सिद्ध होऊ शकतो.
अभिजीत राणे लिहितात
यु एस एड च्या माध्यमातून जगभरातील राज्यतंत्र उलथून टाकण्यासाठी किंवा एखाद्या देशात राष्ट्रविघातक विचार प्रसारित करण्यासाठी अमेरिकेने पैसा खर्च केला हे उघड झाले आहे. जगभरातील अनेक देश यामुळे संतप्त झाले असून आपल्या देशातील लाभार्थी कोण आणि त्यांनी या निधीचा वापर करून आपल्या नागरिकांशी आणि देशाशी गद्दारी केली आहे का हे शोधून त्यांना शिक्षा देण्याचे सुतोवाच अनेक देशांमध्ये सुरु झाले आहे. भारतात सुद्धा अमेरिकेने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पाण्यासारखा पैसा ओतला होता. याचा परिणाम सुद्धा झाला आणि चारशे पार होणारे मोदी सरकार अडखळत सत्तेवर आले. यामुळे सरकारच्या कामाचा धडाका मंदावला आहे अर्थात भारताच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसते आहे. घटक पक्षांच्या मतांचा विचार करूनच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा यु एस एड चे भारतातील लाभार्थी कोण ? हा निधी मिळाल्यावर त्यांनी काय काम केले ? या निधीचा विनियोग कसा केला ? याची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करणे आवश्यक आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांना हे झारीतील शुक्राचार्य कोण हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.
अभिजीत राणे लिहितात
नालायक आणि भ्रष्ट राज्यकर्ते आपल्यावरील नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी विद्वेषाचे राजकारण सुरु करतात. कर्नाटकातील कॉंग्रेस सरकार म्हणजे मूर्तिमंत अराजक आहे. मग कन्नड जनतेला भुलवण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या शिळ्या कढीला उत आणायचे उद्योग सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा नालायक राजकारणी मंडळींची कमी नाही. उद्धव सेना आपल्या उथळ वक्तव्य आणि वर्तनासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही माकड एकत्र येऊन प्रांतीय अस्मितेला फोडणी देण्याच्या प्रयत्नात आहेत. काल कर्नाटकात एका एस टी बस कंडक्टरला कन्नड येत नाही म्हणून मारहाण केली गेली. उद्धव सेनेने पुण्यात पोलिसांच्या आणि मिडीयाच्या उपस्थितीत कर्नाटक परिवहन बस ला काळे फासण्याचा इव्हेंट केला. कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे. महाराष्ट्रात तुम्ही महाविकास आघाडीत कॉंग्रेसचे सहकारी आहात त्यामुळे काळेच फासायचे असेल तर तुम्ही तुमचा पुरुषार्थ योग्य ठिकाणी दाखवा ना.. कॉंग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासण्याचे धाडस स्वतः संजय राऊत यांनी करून दाखवावे. निर्जीव बस वर पराक्रम दाखवायला हिम्मत लागत नाही जिवंत माणसाला काळे फासायला लागते. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सल्ले देण्याची उठाठेव न करता संजय राऊत यांनी कृतीतुन आदर्श निर्माण करावा असे आमचे आवाहन आहे.
अभिजीत राणे लिहितात
“सरकार उनकी हुई तो क्या सिस्टीम तो हमारा है.” द काश्मीर फाईल्स या चित्रपटातील हे वाक्य महाराष्ट्र भाजपला शंभर टक्के लागू पडते आहे. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र शासनाच्या खिशातून पैसे घालून चालवल्या जाणाऱ्या कला , साहित्य ,संगीत आणि संस्कृती या क्षेत्रात काम करणाऱ्या एकाही संस्थेवर संघाच्या मुशीतून घडवला गेलेला एकही हिंदुत्ववादी कार्यकर्ता नेमण्याचे महत्व भाजपला उमगले नाही. कला , साहित्य ,संगीत आणि संस्कृती या क्षेत्राला आणि या क्षेत्रातील व्यक्तींच्या वर्तनाला , वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. त्यामुळे इथे जे काही निर्माण होईल , बोलले , लिहिले जाईल त्याचा समाजावर खूप मोठा प्रभाव पडतो. या क्षेत्रातील मंडळींना पोसून आणि या क्षेत्रात आपल्या विचारधारेची मंडळी स्थापित करूनच कॉंग्रेसने आजवर समाजावर आपली मोहिनी कायम ठेवत आपली राजवट प्रदीर्घ काळ टिकवली. ९८ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भाजपचे हे अपयश परत एकदा अधोरेखित झाले आहे. महायुतीच्या खर्चाने झालेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते. नरेंद्र मोदींचे भाषण वगळता या व्यासपीठावर एकही हिंदुत्ववादी वक्त्याचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे भाषण झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालावे असे हे प्रकरण आहे.
Comments