top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

dhadakkamgarunion0

🖋️ अभिजीत राणे लिहितात

तब्बल २३७ जागांची ताकद आपल्याबरोबर घेऊन देवेन्द्रजी फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. याचा आत्मविश्वास आता त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत आहे. तसेही देवेन्द्रजी उत्तम संसदपटू आहेतच परंतु आता त्यांच्या वाणीला वेगळीच धार आली आहे. काल विधानसभेत चर्चा सुरु होती त्यात देवेन्द्रजी यांच्यावर विरोधकांनी आरोप केला की एकनाथजी शिंदे यांच्याशी सत्तासंघर्ष सुरु असल्याने त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांना देवेन्द्रजी स्थगिती देत आहेत , निर्णय फिरवत आहेत. यावर देवेन्द्रजी उत्तरले आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का ? उद्धव ठाकरे यांना देवेन्द्रजींनी अशी सणसणीत शालजोडीतील लगावून दिल्यामुळे विरोधक निःशब्द झाले आणि सत्ताधारी सदस्यांनी बाकडे वाजवत आणि हशांच्या कल्लोळात सभागृह डोक्यावर घेतले. उद्धव ठाकरे यांच्या घरबश्या आणि स्थगिती सम्राट कारकिर्दीचे वाभाडे निघणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा मुख्यमंत्री कसा नसावा याचा वस्तुपाठ म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महावितरण आणि महाराष्ट्र पोलीस अश्या दोन्ही खात्यांनी एकमेकांना चंद्रपूर मध्ये दणका देऊन दाखवले आहे आणि जनसामान्य या दोन विभागातील भांडणाची मजा बघत आहेत. मार्च महिना हा सगळ्याच सरकारी खात्यांचा बजेट खर्च करून टाकण्याचा आणि वसुलीची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा महिना असतो. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे तब्बल ८१ लाखांचे वीजबिल थकले होते. तगादा लावूनही पोलीस खाते बिलाचा भरणाच करत नव्हते. त्यामुळे महावितरण खात्याने शक्कल लढवत पोलीस वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे वीज कनेक्शन कापले. पोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा थांबल्याने पोलिसांना घरचा आहेर मिळाला. त्यामुळे पोलिसांनी प्रतिहल्ला चढवत महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वहातुक पोलिसांना नेमून महावितरण कर्मचाऱ्यांकडून दंडवसुली सुरु केली. यामुळे महावितरण कर्मचारी धास्तावले. अखेरीस वरिष्ठांनी हस्तक्षेप करून गुपचूप वीज कनेक्शन जोडले आणि वहातुक पोलीस पण गायब झाले. हा मजेदार वाद रंगत असताना सामान्य नागरिक मात्र आमच्या बाबतीत हा समजूतदार पणा का दाखवला जात नाही ? असा सवाल विचारत आहेत. दोन्ही खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच अखत्यारीत येतात. देवेन्द्रजींना हा किस्सा समजल्यावर कारवाई होईल का ? आणि कुणावर होईल ? अशी चर्चा रंगली आहे..

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अपमानास्पद वर्तन करणारे झेलेन्स्की युक्रेनला पोचल्यावर जमिनीवर आले आहेत. अमेरिकेशी गौण खनिजांचा करार करण्याची त्यांनी विनाशर्त तयारी दाखवली आहे. युरोपियन राष्ट्रे मदत करतील हा भ्रम दूर झाल्याने झेलेन्स्की यांची भाषा बदलली आहे. इंग्लंडने झेलेन्स्की याला २ अरब पौंडाचे कर्ज आणि ते सुद्धा ८ टक्के दराने देण्याची तयारी दाखवली आणि झेलेन्स्की यांना ही मदत नसून आपल्या देशाला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचे षडयंत्र आहे हे लक्षात आले. आता झेलेन्स्की निमूटपणे अमेरिकेशी करार करतील परंतु त्यांची मुख्य मागणी अजूनही, ‘रशिया परत आक्रमण करणार नाही याची हमी घ्या.’ हीच आहे. झेलेन्स्की यांनी ही मागणी करण्यात गैर सुद्धा नाही कारण रशियाने स्वातंत्र्य देताना आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही अशी हमी दिली होती. नेटो राष्ट्रांनी सुद्धा त्यांनी हल्ला केला तर आम्ही मदत करू अशी हमी दिली होती. या दोन्ही हमींच्या पार्श्वभूमीवरच युक्रेनने आपल्या अण्वस्त्रांना नष्ट केले होते. झेलेन्स्की सत्तेवर आल्यावर त्याने रशियाला आक्रमकपणे अंगावर घ्यायला सुरुवात केली आणि नंतर युद्ध पेटले. त्यामुळे आता झेलेन्स्की यांना ठोस अभिवचन हवे आहे आणि त्यात गैर नाही. कदाचित खनिज करारामुळे अमेरिकाच आपल्या सैन्याची एखादी तुकडी युक्रेन मध्ये कायम करेल ज्यामुळे ही भीती उरणार नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देशातील आघाडीची अभियांत्रिकी कंपनी लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन सुब्रमण्यम काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. त्याच सुब्रमण्यम यांनी एक अत्यंत क्रांतिकारी आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे ज्यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे. लार्सन अँड टुब्रो कंपनी आता मासिक पाळीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाची पगारी रजा देणार आहे.या निर्णयामुळे कंपनीच्या सुमारे ५००० महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना पगारी रजा देणारी लार्सन अँड टुब्रो त्यांच्या क्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली आहे. दरम्यान यापूर्वी स्वीगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांनीही मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची पार्श्वभूमी अशी आहे की मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरिक श्रम करणे कठीण जाते. त्यांना मूड स्विंगचा सामना सुद्धा करावा लागतो आणि म्हणूनच आपल्याकडे महिलांना चार दिवस घरकामातून सुट्टी दिली जात असे. याचा विचार करून सरकारने सुद्धा कंपन्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा असे सांगितले होते आणि त्याला लार्सन अँड टुब्रोने प्रतिसाद दिला आहे. कंपनीचे अभिनंदन.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिल्लीतील भाजप सरकार शांतपणाने आणि व्यवस्थित कामाला लागले आहे. गेल्या काही वर्षात आम आदमी पार्टीच्या आशीर्वादाने दिल्ली हे बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे अड्डा बनू लागले होते. या लोकांना नागरी सुविधा देत मागच्या दाराने नागरिक बनवत आम आदमी पार्टी आपला घाऊक प्रमाणातील बेकायदेशीर मतदार निर्माण करत होती. दिल्ली दंगलीत सुद्धा क्रौर्याचे जाहीर प्रदर्शन करणारे स्थानिक मुसलमान नव्हते तर हे समस्त रोहिंग्या आणि बांगलादेशीच होते. दिल्ली दंगलीचा मुख्य आरोपी आप नेता हा सुद्धा बांगलादेशीच आहे. आता या सगळ्यांच्या कागदपत्रांची छाननी मोहीम सुरु झाली असून समस्त बांगलादेशी आणि रोहीन्ग्यांना त्यांच्या देशात हाकलून देण्याची तयारी सुरु झाली आहे आणि त्याचा मुख्य भाग म्हणजे स्थानिक पातळीवर या लोकांना हुडकून काढणे आणि ते काम दिल्लीतील नवनिर्वाचित सरकार पूर्ण निष्ठेने करते आहे.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page