top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

dhadakkamgarunion0

🖋️ अभिजीत राणे लिहितात

परवा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर लंडन मध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी विफल हल्ला केला, भारताचा ध्वज जाळला. या घटनेवर भाष्य करताना ब्रिटीश परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत एक घृणास्पद वक्तव्य केले, "भारतीय संसदेतील एक व्यक्ती आपल्या देशात आला होता त्याच्यावर हल्ल्याचा प्रयास झाला." एका गंभीर घटनेला त्यांनी इतके गौण स्वरूप का दिले ? परराष्ट्रमंत्री हा शब्द का वापरला नाही ? त्याचे कारण अधिकच धक्कादायक आहे. ब्रिटनने भारताला आठवण करून दिली की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भारतीय सेना ब्रिटन कडून लढली होती आता युक्रेनमध्ये जर युरोपियन देशांनी लढायचे ठरविले तर भारताने आपली सेना पाठवावी. याला जयशंकर यांनी क्षणार्धात नकार दिला. अजूनही वसाहतवादी मानसिकतेत असलेल्या ब्रिटनला हा त्यांचा अपमान वाटला आणि त्यामुळे कदाचित ब्रिटीश सरकारनेच हा हल्ला घडवून आणला असल्याची सुद्धा शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला राष्ट्रकुलात रहाण्याची काहीही गरज नाही. एकेकाळी अमेरिकेवर सुद्धा ब्रिटीशांचे राज्य होते पण तरीही ते कधी राष्ट्रकुलाचा भाग झाले नाहीत. भारताने सुद्धा या औपचारिक गुलामगिरीचा त्याग करण्याची वेळ आली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उद्धव ठाकरे आणि कंपूला सध्या नवीन सावज सापडले आहे ते म्हणजे संघाचे जेष्ठ कार्यकर्ते भय्याजी जोशी. भय्याजी जोशी यांनी घाटकोपर इथे भाषण करताना घाटकोपरमध्ये गुजराती नागरिक मोठ्या प्रमाणत रहात असून इथली स्थानिक भाषा गुजराती आहे , पार्ल्याची भाषा मराठी आहे असा उल्लेख केला. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापले असून त्यांनी भय्याजी जोशी यांच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ठाकरे यांचा गुजराती द्वेष निवडणूक आली की आणि सामान्य गुजराती लोकांसंदर्भात नेहमीच उफाळून येतो परंतु गुजराती अंबानींच्या लग्नात दोन दिवस मेजवानी खाताना आणि संगीताच्या तालावर नाचताना यांची मराठी अस्मिता झोपलेली असते. ठाकऱ्यांची ही वेचक मराठी अस्मिता महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थित उमगल्याने त्यांचा पक्ष राज्य पातळीवर भिंग हातात घेऊन शोधावा लागतो. त्यांनी याच पद्धतीने उर्मट वक्तव्य करणे सुरु ठेवले तर बृहन्मुंबई महापालिकेत सुद्धा यांच्या पक्षाचे अस्तित्व भिंग लावूनच शोधावे लागणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोव्हीड अर्थात कोरोना हा आजार चीन मधील जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून जगभरात पसरला हे सर्वज्ञात सत्य आहे. जगभरात या आजारामुळे तब्बल ७० लाख नागरिक मृत्यू पावले आहेत. चीन मधील मृतांची खरी संख्या कधीच कळू शकत नाही. या आजाराने संपूर्ण जग २ वर्ष मागे लोटले गेले. जगभरातील छोट्या राष्ट्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. या धक्क्यातून जग सावरत असतानाच चीनमध्ये परत एकदा श्वसनाशी संबंधित साथीच्या रोगाने थैमान घातले असल्याचे वृत्त बाहेर आले आहे. चीन मध्ये हॉस्पिटल आणि कब्रस्तानाच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. शवपेटीचा दर तिप्पट झाला आहे आणि तरीही मिळत नाहीत. अर्थात संपूर्ण चीनला परत एकदा साथीच्या रोगाने व्यापले आहे आणि हा आजार प्राणघातक आहे. कोरोना काळापासून भारत आणि चीन थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. मध्यंतरी द्वीपक्षीय ठरावानुसार ती परत सुरु झाली होती परंतु आता पुन्हा एकदा ती बंद करण्याची वेळ आली आहे अन्यथा हा आजार भारतात सुद्धा पसरेल. जगभरात या वार्तेने खळबळ उडाली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या ताज्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. एका मुलाखतीत मणिशंकर अय्यर यांनी सांगितले राजीव गांधी ज्यावेळी केम्ब्रिज इथे शिकत होते त्यावेळी मी पण तिथेच शिकत होतो. या विद्यापीठाचा शैक्षणिक पॅटर्नच असा आहे की कोणीही इथे नापास होऊ शकत नाही पण राजीव गांधी यांनी इथे नापास होऊन दाखवले. नंतर ते इम्पिरियल कॉलेजला गेले होते तिथेही त्यांची तीच अवस्था झाली. त्यामुळे त्यांची पंतप्रधानपदावर निवड झाल्यावर मला धक्काच बसला. मी विचार केला आयुष्यात दोन वेळा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो ?मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याला नाकारणे काँग्रेसी नेत्यांना शक्य नाही आणि राजीव गांधी यांची बेअब्रू सहन करणे पण शक्य नाही. ‘राजीव गांधींनी देशाला आधुनिक दृष्टीकोन दिला. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठीही ठोस पावले उचलली.’ या सारख्या गुळमुळीत वाक्यांनी काँग्रेसी नेत्यांची सारवासारव सुरु आहे. परंतु या मुलाखतीने राजीव गांधी यांचे मातीचे पाय दाखवून दिले नसून घराणेशाहीमुळे कोणत्या दर्जाचे नालायक आपल्यावर राज्य करतात हे पण सिद्ध केले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उबाठा सेना खासदार संजय राऊत, शरदपवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे आमदार रोहित पवार आणि लयभारी हे यु ट्यूब चॅनेल यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो दाखल करून घेतला असून पुढील कारवाई अपेक्षित आहे. एका महिलेला गोरे यांनी ९ वर्षांपूर्वी नग्न छायाचित्रे पाठवून तिचा मानसिक छळ केला असा त्यांच्यावर आरोप होता. त्यावेळी त्या प्रकरणात न्यायालयात गोरे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले होते. त्याच प्रकरणातील पिडीत महिलेला त्यांनी परत त्रास देण्यास सुरुवात केली आहे अश्या पद्धतीचा आरोप करणारे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते, पिडीत महिलेने राज्यपाल , मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता. जयकुमार गोरे यांनी मी निर्दोष आहे. माझ्या वडिलांचे निधन होऊन आठ दिवस सुद्धा झाले नाहीत आणि माझ्यावर अश्या पद्धतीचे आरोप केल्याने माझी समाजात प्रतिमा डागाळते आहे. हा सत्तेचा दुरुपयोग आहे का राजकीय द्वेषापोटी एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याची चिरफाड यावर विधानसभेत साधकबाधक चर्चा होऊन निकाल लागेल. पण या प्रकरणात राऊत आणि पवार दोषी सिद्ध झाले तर त्यांच्यावर काय कारवाई होईल हा औत्सुक्याचा विषय आहे.






 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page