top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

dhadakkamgarunion0





















🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिल्ली विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित झालेले अरविंद केजरीवाल एक क्षणही सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत का ? आंदोलनातून उभे राहिलेले, समस्त राजकीय नेत्यांना भ्रष्ट आणि सत्तापिपासू म्हणणाऱ्या नेतृत्वाचे पाय सुद्धा मातीचे असावेत हे लज्जास्पद असते. दिल्ली निवडणुकीतील दणदणीत पराभवानंतर अरविंद केजरीवाल आता विपश्यना करायला पंजाबात जात आहेत. पुढील चार दिवस ते मौन धारण करून आत्मपरीक्षण करणार आहेत आणि त्या नंतर बळवंत मान यांना त्याग करायला लावून बहुदा पंजाबचे मुख्यमंत्रीपद बळकावणार असल्याची चर्चा आहे. केजरीवाल यांनी मागच्या दाराने मुख्यमंत्री पद बळकावण्याचे मुख्य कारण म्हणजे दारू घोटाळ्यात त्यांची तुरुंगवारी निश्चित आहे. मुख्यमंत्री या घटनात्मक विराजमान असलेल्या केजरीवाल यांना अटक टाळणे शक्य होईल. टाळता नाही आली तरी अटक लांबवता येईल. त्यामुळे केजरीवाल केवळ उर्वरित दोन वर्षांसाठी का होईना मुख्यमंत्रीपद मिळवून कायदेशीर ससेमिरा वाचवण्याचा प्रयास करतो आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने पहिला धडक निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला आणि अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी हा निलंबन प्रस्ताव मांडला आहे. या प्रकरणात अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. औरंगजेबाचे शिस्तबद्ध उदात्तीकरण करण्याचे पातक शरद पवारांच्या कृपेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केले आहे. मनोज जरांगे पाटील , प्रकाश आंबेडकर , अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर वहाण्याचे ढोंग करून झाले आहे. खुनी , पापी औरंग्याला मोठे करण्याच्या प्रयत्नांना या निलंबनाच्या माध्यमातून वेसण घालणे आवश्यक होते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

वाघाला मानवी रक्ताची चटक लागली की तो अधिकाधिक बळी मिळवण्याचा प्रयास करू लागतो. पहिल्याच दिवशी गदारोळ करण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे वृत्त आल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या अंगात सध्या बारा हत्तीचे बळ आले आहे. यावेळी टीकेचे लक्ष्य आहेत मंत्री जयकुमार गोरे. त्यांनी एका महिलेला अश्लील आणि विवस्त्र फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप होतो आहे. सदरील महिला ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुळातील असून त्यांचा छळ आणि विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो आहे. हे आरोप अत्यंत गंभीर असून त्यांचा राजीनामा घेतला जावा म्हणून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सदरील महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. सरकारने त्या पूर्वीच गोरे यांचा राजीनामा घ्यावा असे विरोधक दडपण आणत आहेत.दुसरीकडे अंजली दमानिया या प्रकरणात थेट राज्यपालांची भेट घेणार आहेत. आता विरोधकांना अजून एका मंत्र्याला घरी पाठवण्यात यश मिळते का ? हा औत्सुक्याचा विषय आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळे नेटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही दुसरे महायुद्धोत्तर बहुराष्ट्रीय सुरक्षा आघाडी आता इतिहासजमा होणार का ?असा सवाल चर्चेत आहे. अमेरिका, कॅनडा तसेच पश्चिम, उत्तर, मध्य युरोपातील अनेक देशांनी मिळून नेटो ही संघटना आकाराला आली. या देशांचा परस्पराशी असलेला करार म्हणजे या सदस्य राष्ट्रांपैकी कोणत्याही राष्ट्रावर नेटो बाह्य राष्ट्राने हल्ला चढवला तर सगळे राष्ट्र त्याच्या बाजूने लढतील. या करारामुळे एकट्या अमेरिकेचे युरोपात विविध देशांमध्ये मिळून १ लाख सैनिक तैनात आहेत. युरोपातील कोणत्याही नेटो सदस्य देशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात खडे सैन्य नाही. अमेरिकेच्या संरक्षणाचे हे नेटो छत्र आपल्या डोक्यावर असल्याने बरीच युरोपियन राष्ट्रे सैन्य आणि शस्त्रास्त्रे यावर खर्चच करत नाही. आता अमेरिकेने भूमिका बदलली असून युरोपातील नेटो राष्ट्रांच्या सुरक्षेचे ओझे अमेरिका स्वीकारायला यापुढे तयार नाही. त्याच प्रमाणे युक्रेनसारख्या बिगर-नेटो देशाच्या रक्षणाची जबाबदारी नेटोची नाही, अशी अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाची भावना आहे. या भूमिकेमुळे अमेरिकेचा सैन्यावर होणारा प्रचंड खर्च नियंत्रणात येईल. देशाची आर्थिक स्थिती नाजूक असताना अश्या पद्धतीने संपत्ती उधळणे चुकीचे आहे असे ट्रम्प यांचे मत आहे. याचा परिणाम युरोपातील राष्ट्रांच्या उन्मत्त वागण्यावर नियंत्रण येण्यात होणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना केजरीवाल टर्न घेण्याची अर्थात घुमजाव करण्याची वेळ आली आहे. संतोष देशमुख खून प्रकरण पेटलेले असताना त्यांच्या भेटीला धनंजय मुंडे गेले होते त्यावेळी त्यांनी मुंडेंची बाजू घेतली होती. धनंजय मुंडे हे राजकीय कुटुंबात जन्माला आले. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांना जातीयवादाच्या आहारी जाऊन गुन्हेगार ठरवण्याचा प्रयास होतो आहे असे वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना सत्य काय आहे ते सांगितले. किती क्रूर आणि अमानुष खून केला आहे हे पण सांगितले. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी मौन धारण केले होते. आरोपपत्र दाखल झाले. गुन्ह्यातील क्रौर्य उघड झाले आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर आता महादेव शास्त्री यांना पश्चातबुद्धी झाली असून धनंजय मुंडे यांच्याविषयीचं माझं वक्तव्य हे अजाणतेपणातून होतं.. न्यायालयाला मी प्रार्थना करतो की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. भगवान गड नेहमीच पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे. थोडक्यात धनंजयरावांचा अध्यात्मिक आधार सुद्धा नाहीसा झाला आहे.

🔽

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page