🖋️ अभिजीत राणे लिहितात
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होते आहे. महायुतीकडे प्रचंड न हलवता येणारे बहुमत आहे. आणि महाविकास आघाडी ही कागदावर सुद्धा एकत्र नाही. कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजून तरी आपला काहीही प्रभाव टाकू शकलेले नाहीत. वडेट्टीवार चुकीचे बोलून फसले आहेत. दुसरीकडे शरद पवार हेच राष्ट्रवादी पवार गटाचा एकखांबी तंबू आहेत. जयंत पाटील यांची संभ्रमावस्था उघड दिसून येते आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करण्याची स्पर्धा सुरु आहे. अश्या पार्श्वभूमीवर चहापानावर बहिष्कार टाकण्याइतपत या तीन पक्षांचे एकमत झाले हीच सर्वात मोठी बातमी आहे. विस्कळीत महाविकासआघाडी हे महायुतीसाठी वरदान सिद्ध होते आहे. परंतु काही आमदार आपल्या घणाघाती भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत ते मात्र सरकार वर तुटून पडतील यात संशय नाही. परंतु त्यात सुद्धा विरोधीपक्षनेतेपद मिळण्याची आस असणारी उबाठा सेना आणि त्यांचे संभाव्य उमेदवार भास्कर जाधव फडणवीस यांना दुखावण्याइतपत टीका करणार नाहीतच. एकंदर विरोधीपक्षहीन अधिवेशन असल्याने सत्ताधारी सुस्तावले आहेत. जर धनंजय मुंडे आणि कोकाटे यांचे राजीनामे सरकारने घेतले तर विरोधकांना विरोध कशासाठी करायचा हाच प्रश्न पडेल अशी स्थिती आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ओव्हल ऑफिस मध्ये पत्रकारांच्या समोर डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नळावरील बायकांच्या प्रमाणे भांडणारे झेलेन्स्की युरोपात पोचल्यावर निवळले आहेत. मी अमेरिकेशी चर्चा करून मिनरल्सची डील करण्यास तयार आहे असे त्यांनी वक्तव्य केले आहे. परंतु आता अमेरिका आणि युक्रेन यांच्या संबंधातील निर्माण झालेला तणाव निवळणार का हा खरा प्रश्न आहे. परवा झेलेन्स्की ज्या पध्दतीने ट्रम्प यांच्याशी वाद घालत होते त्या पत्रकारपरिषदेतील युक्रेनची अमेरिकेतील राजदूत अक्षरशः रडू लागली कारण याचे परिणाम काय संभवतात याची तिला पूर्ण कल्पना होती. अपात्र व्यक्तीला आपण सर्वोच्च स्थानी पोचवल्यावर तो त्याच्या अपरिपक्व वागण्याने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आणि देशातील कोट्यावधी नागरिकांच्या जीवाला कश्या पद्धतीने धोक्यात घालू शकतो याचे सर्वात विकृत स्वरूप जगाने बघितले आहे. याच पद्धतीचे बेजबाबदार आणि अहंकारी वर्तन गेली कित्येक वर्षे राहुल गांधी करत आले आहेत आणि कॉंग्रेस मधील व मीडियातील भाट त्यांच्या या उद्दाम वागण्याचे कौतुक करत आले आहेत. कालच्या घटनेचे जे परिणाम पुढील सहा महिन्यात युक्रेन भोगणार आहे ते बघितल्यावर भारतातील मंडळींचे डोळे उघडतील अशी आशा आहे.
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारपरिषद झाली आणि त्यात गेल्या दोन तीन महिन्यात निर्माण झालेल्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला. गेले दोन महिने मिडिया महायुतीमधील अंतर्गत सत्तासंघर्षाला चव्हाट्यावर आणत असल्याचा आव आणून बऱ्याच बातम्या निर्माण करत होता. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना कॉर्नर करत आहेत. अजित दादा आणि देवेंद्र यांनी एक महायुती मध्ये उपयुती बनवली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक मंत्र्यांच्या भ्रष्ट स्टाफ बद्दल वक्तव्य करून शिवसेनेच्या मंत्र्यांकडे भ्रष्ट म्हणून बोट दाखवले आहे. अश्या सगळ्या बातम्यांना देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेला सामोरे जात आणि पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची निरुत्तर करणारी उत्तरे देऊन पूर्णविराम प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील पत्रकार कायमच महायुतीला सापत्न वागणूक देतात. अजूनही महाराष्ट्रातील पत्रकार हे पवारांचे सुपारी वाजवणारे हस्तक म्हणून वावरत असतात. परंतु त्यांच्या या सगळ्या काड्यांना पुरून उरत महायुती दणक्यात काम करत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महायुती सरकार मधील एकमेव हिंदुत्ववादी नेता म्हणून नितेश राणे यांचेच नाव घ्यावे लागेल. मढी येथे कानिफनाथांची यात्रा भरते. यात्रेच्या या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि पलंगही वापरत नाही. पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावतात. याच कारणामुळे मुस्लिम व्यापाऱ्यांना या यात्रेत बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने केला आणि त्या ठरावाच्या विरोधात मुस्लीम व्यापारी गटविकास अधिकाऱ्यांकडे पोचले. अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची बाजू ऐकून न घेता या ठरावाला स्थगिती दिली. यानंतर या प्रकरणात नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना फैलावर घेतले. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले आहे. तुम्ही अश्या पद्धतीने ग्रामस्थांचे न ऐकता मनमानी करू शकत नाहीत असे बजावून त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचा निर्णय रद्दबादल ठरवला आहे. मुस्लिमांना हिंदूंच्या यात्रांना जत्रांना जाऊन पैसे कमवायचे असतात पण हिंदूंच्या परंपरांचे पालन करण्याची मात्र त्यांची तयारी नसते. या प्रकरणातून मुस्लीम व्यापाऱ्यांची ही स्वार्थी वृत्ती उघड झाली हे उत्तम झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संजय राऊत महायुती सरकारवर तुटून पडले आहेत. महाराष्ट्रात जिथे सत्ता तिथे बलात्कारी, खुनी आणि व्यभिचारी अशी अवस्था झाली आहे. राज्यात जर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातील लेकीबाळींची काय परिस्थिती असेल ? नुसतं लाडकी बहीण, लाडकी बहीण करून, लाडका भाऊ करून काय उपयोग ? त्यांच्या या आरोपांना निराधार म्हणता येणार नाही. संतोष देशमुख खून प्रकरणात अजूनही सरकारकडून निर्णायक कारवाई होईल असे लोकांना वाटत नाही. स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झाला आहे. रक्षा खडसे यांच्या कन्येला सुरक्षा व्यवस्थेत असताना सुद्धा छेडछाडीला सामोरे जावे लागते आहे या सगळय घटनांच्या मुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे आणि यावर संजय राऊत यांनी नेमके बोट ठेवले आहे. केवळ कठोर कायदे करून काहीही फायदा होत नसतो. पोलिसांनी हातात दंडुका घेऊन तो चालवण्यास सुरुवात केल्याशिवाय गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. वेळप्रसंगी पोलिसांना सुद्धा कठोर आणि निष्ठुर व्हावेच लागते त्याशिवाय गुन्हेगारांवर वचक निर्माण होत नाही. त्यामुळे राऊत यांच्या टीकेला सकारात्मक पद्धतीने घेऊन पोलिसांना कार्यशैलीत सुधारणा करण्यास सांगणे अत्यंत आवश्यक आहे.
🔽





Kommentare