




🖋️ अभिजीत राणे लिहितात
श्री. सुनील राणे हे केवळ एक यशस्वी राजकारणी नसून, शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित असलेले एक द्रष्टे नेते आहेत. त्यांची अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ही संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात एक आदर्श ठरली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्याचा जो वसा घेतला आहे, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांनी अनेक गरजू महिलांना स्वावलंबी बनवले आहे. त्यांचा "One For All, All For One" उपक्रम हेच दर्शवतो की ते केवळ आपल्या भागासाठी नव्हे, तर देशाच्या सुरक्षेसाठीही कटिबद्ध आहेत.2019 मध्ये त्यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी तब्बल 95,021 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली. आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांचे नेतृत्व आणि विकासात्मक दृष्टिकोन यामुळे बोरीवली हा मुंबईतील सर्वाधिक विकसित आणि सुव्यवस्थित मतदारसंघांपैकी एक ठरला आहे.त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. लोकांच्या गरजा ओळखून तंत्रज्ञानाधारित प्रशासकीय सुधारणा आणि स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.श्री. सुनील राणे यांच्या अथर्व फाउंडेशनने शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. खेळाच्या क्षेत्रातही त्यांनी युवा प्रतिभांना जागतिक पातळीवर संधी मिळवून देण्यासाठी भरीव प्रयत्न केले आहेत. भारतीय जवानांच्या कुटुंबांसाठी त्यांच्या मदतीच्या उपक्रमांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. अशा दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अथक मेहनतीने आणि नेतृत्वगुणांमुळे अनेकांना प्रेरणा मिळते आणि भविष्यातही ते असाच समाजहितासाठी कार्य करत राहोत, हीच शुभेच्छा!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
धनंजय मुंडे राजीनामा देणार ? देवेंद्र फडणवीस यांच्या संयमी वृत्तीला दाद द्यावीच लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयास झाला. प्रत्युत्तरादाखल वंजारी समाजाने सुद्धा रस्त्यावर येत निषेध नोंदवला. परंतु देवेन्द्रजींनी सी आय डी ला त्यांच्या पद्धतीने तपास करू दिला. वाल्मिक कराड यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेला खंडणीचा गुन्हा तसाच राहू देत सगळ्यांनाच अंधारात ठेवत तपास पूर्ण झाला आणि आता जे १८०० पानी आरोपपत्र दाखल झाले आहे त्यात वाल्मिक कराड यांनीच हत्या घडवल्याचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे अर्थात या खुनाचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे सिद्ध झाले आहे. आता संपूर्ण खटला याच पद्धतीने चालवला जाणार असल्याने आता मात्र धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर ठेवणे इष्ट ठरणार नाही. ३ मार्च ला विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होते आहे, विरोधकांनी या मुद्द्यावर निश्चितच सरकारवर तुटून पडण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या विरोधातील हवा काढून घेण्यासाठी बहुदा पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल. गेले दोन महिने निर्माण झालेला जातीयवादाचा धुरळा आता शांत होणार आणि जातीजातीत द्वेष पेटवणारे हताश होणार.
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तरुण तुर्क नेते रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. आरोग्य मंत्रालयातील ३८०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातील मंत्रीमहोदय तानाजी सावंत यांचा निर्णय रद्द करून ७० कोटी रुपयात हेच काम मानवी हातांनी चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आता जोडीला अँम्ब्युलन्स खरेदी घोटाळ्याची पण चौकशी करा अशी विनंती केली आहे. तानाजी शिंदे हे एकनाथ शिंदेंचे नजीकचे सहकारी आहेत. मध्यंतरी सुपुत्राच्या बँकॉकवारीला रोखण्यासाठी त्यांनी केलेला अपहरण बनाव उघडकीस आल्याने ते आधीच बदनाम झाले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्याने शिंदे शिवसेनेची बदनामी होते आहे परंतु यावेळी तानाजी सावंत यांना मंत्री न केल्यामुळे शिवसेनेची बेअब्रू होणे टळले आहे. परंतु या सगळ्या घटनाक्रमात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळ होत असून महायुती मधील दोन्ही घटक पक्ष हे मानसिक दडपणाखाली असतील आणि त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक निर्णयाला मम म्हणण्याला पर्याय रहाणार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण ब्रिटनच्या बाबतीत खरी ठरणार असे दिसत आहे. सध्या ब्रिटन हा निर्वासित मुस्लीम आणि देशातील मुस्लीम नागरिक यांच्या वाढत्या संख्येने , गुन्हेगारीने , दंगलीने संत्रस्त झाला आहे. संपूर्ण युरोपात उजव्या विचारसरणीच्या नेतृत्वाच्या हातात सत्ता जात असताना ब्रिटन मध्ये अजूनही डाव्यांचा वरचष्मा आहे. त्यामुळे झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील वादविवादात युरोपातील अन्य राष्ट्रे अमेरिकेच्या पाठीशी उभी रहात असताना ब्रिटनने मात्र वेगळा सूर आळवला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान केरी स्टार्मर यांनी झेलेंस्की यांची भेट घेत युद्धासाठी त्यांना तब्बल २.२२६ अब्ज पौंडची मदत घोषित केली . ब्रिटन युक्रेनच्या पाठीशी असल्याचा संदेश जगाला दिला. थोडक्यात वसाहतवाद आणि साम्राज्यवाद या दोन्ही गोष्टींचा जागतिक पातळीवर शेवट झाला असतानाही इंग्लंड मात्र आपल्या जुन्याच दिवास्वप्नात रममाण आहे. ब्रिटनच्या या घोषणेचा परिणाम काय होऊ शकतो ? डेन्मार्क ब्रिटनची साथ देईल. इटली , जर्मनीमधील नवनिर्वाचित सरकार आणि फ्रांस अमेरिकेच्या पाठीशी उभा राहील आणि युरोपातच युक्रेन या मुद्द्यावर फुट पडेल. ट्रम्प ब्रिटनची कशी वाट लावणार हा भविष्यातील बघण्याजोगा अध्याय असेल हे नक्की. ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशाचे तुकडे केले त्यांचे तुकडे होताना बघणे ही सर्वात आनंदाची गोष्ट असेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उबाठा गटाचे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शब्दिक चकमक चांगलीच रंगली असून त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहन भागवत यांना सुद्धा ओढण्यात संजय राऊत यांनी यश मिळवले आहे. उद्धव ठाकरे हे प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात गेले नाही. त्यांनी स्नान केले नाही. या मुद्द्यावर त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. एकीकडे आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणायचे आणि दुसरीकडे महाकुम्भाला जाऊन अमृतस्नान करायचे नाही अश्या शब्दात शिंदे यांनी टीका केली तर संजय राऊतांनी अमृत स्नानाला गेलो नाही म्हणजे हिंदुत्ववादी नाही हा तर्कच चुकीचा आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यात हिम्मत असे तर त्यांनी हाच सवाल सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारावा करणे ते सुद्धा अमृत स्नानाला गेले नाहीत. असे म्हणून सिक्सर मारला आहे. प्रत्येकाला अमृत स्नानाला जाणे शक्य होत नाही. काही कामे असतात , काही अडचणी असतात. पण म्हणून त्यावरून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली. असा जोरदार कलगीतुरा रंगलेला असताना मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अश्या विषयांवर कधीच भाष्य करत नाही त्यामुळे त्यांचे मौन आहे. परंतु मोहनजी खरच कुंभमेळ्याला का गेले नाही हा प्रश्न मात्र आता सर्वांच्याच मनात येणार हे नक्की.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
केंद्रीय पातळीवर कॉंग्रेस पक्षातील एकनाथ शिंद्यांचा शोध भाजपने सुरु केला आहे का ? असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक राजकारणातील असंतुष्ट काँग्रेसी नेते डी शिवकुमार यांनी कुंभमेळ्यात जाऊन स्नान केल्याने कर्नाटकातील राजकारण तापले आहे. डी शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते परंतु त्यांना डावलले गेले. डी शिवकुमार हे अहमद पटेल यांच्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न शक्तिशाली नेते आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणात अहमद पटेल यांचे स्थान मोठे होते. त्यांचे मत सोनिया गांधी सुद्धा डावलत नसत. डी शिवकुमार सुद्धा त्याच पातळीचे नेते असूनही त्यांना कॉंग्रेसने नाराज केले आहे आणि भाजप त्यांना गळाला लावण्याचा प्रयास करत आहे. दुसरीकडे स्त्रियांमधील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व , राजपरिवारातील नेतृत्व आणि साक्षात इंग्रजांनी ज्यांच्याकडे शिकवणी लावावी असे इंग्रजी भाषा प्रभू, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री शशी थरूर हे सुद्धा प्रचंड नाराज असून त्यांनी राहुल गांधी यांना पक्षातील माझे नेमके स्थान काय अशी विचारणा करणारे पत्र लिहिले आहे. हे दोन्ही नेते संभाव्य एकनाथ शिंदे आहेत आणि यांनी कॉंग्रेस फोडल्यास कर्नाटकातील कॉंग्रेस सरकार कोसळेल आणि केंद्रात राहुल गांधी यांचे विरोधीपक्षनेते पद जाईल. सध्या चर्चा तर जोरात आहेत पण प्रत्यक्षात काय घडते हे बघावे लागेल.
🔽
Comments