🖋️ अभिजीत राणे लिहितात
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे खासगी सचिव (पीएस) आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (ओएसडी) नेमणुकीबाबत कठोर भूमिका घेतली होती. ‘ज्यांची नावे ‘फिक्सर’ वा चुकीच्या कामांमध्ये गुंतली आहेत अशांच्या नेमणुकीला आपण मान्यता देणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण पेटले आहे तर दुसरीकडे अधिकारी वर्ग सुद्धा नाराज झाला आहे. पीएस आणि ओएसडींना त्यांच्या मर्यादा ओलांडायला लावण्यामागे बऱ्याचदा थेट मंत्र्यांचाच हात असतो. मात्र, बदनामीची वेळ येते तेव्हा मंत्री नामानिराळे राहतात आणि अधिकारी भरडले जातात. मंत्र्यांच्या दबावाला बळी पडायचे नाही म्हणून अनेक पीएस; तसेच ओएसडी मंत्री कार्यालयातून बाहेर पडल्याचीही उदारहणे आहेत; तर मंत्र्यांना माहिती नसताना काही पीएस; तसेच ओएसडींनी सामान्य जनतेचा पैसा लुबाडल्याचीही उदारहणेही आहेत. मात्र, यामुळे सरसकट अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ नये असे या अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कश्या पद्धतीने रुष्ट अधिकाऱ्यांची समजूत काढतात हे बघावे लागेल. पण या टर्म मध्ये देवेन्द्रजी अधिक आक्रमक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध असल्याने त्यांना हा निर्णय घेणे आवश्यक होते परंतु याचे मीडियात बिंग उघड केल्याने अधिकारी वर्ग नाराज झाला आहे आणि ते स्वाभाविक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विधानसभा २०२४ मध्ये दैदिप्यमान यश मिळाल्यानंतर ठाकरे सेनेचे पानिपत झाल्यावर सुद्धा एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर का राबवत आहेत ? आणि आमदारांच्या पेक्षा त्यांना खासदारांना शिवसेनेत ओढून घेण्याची निकड का भासते आहे ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. या संदर्भात दोन तर्क समोर येतात. पहिला तर्क केंद्रातील एन डी ए आघाडीला मोठे कायदे करण्यासाठी लागणारे सुस्पष्ट बहुमत त्यांच्याकडे नाही. नितीशकुमार किंवा चंद्राबाबू नायडू हे विश्वसनीय नाहीत. अश्या परिस्थितीत उद्धव सेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आले तर त्यांच्या माध्यमातून मोदी आणि शहांच्या नजरेत आपले स्थान उंचावणे एकनाथ शिंदे यांना साधेल. याचा लाभ घेऊन महायुतीमध्ये सुरु झालेल्या शीतयुद्धाला आवर घालता येईल. जर देवेंद्र फडणवीस यांची पदोन्नती होऊन त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले तर परत एकदा मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा महायुतीने एकत्र लढल्या तर शिवसेनेच्या पदरात मोठे यश पडेल , एकेकटे लढल्यास निकाल काय लागेल याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. त्यामुळे या तिन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे पूर्ण गांभीर्याने ऑपरेशन टायगर राबवत आहेत. त्यांना किती यश मिळते हे येणारा काळ ठरवेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येते आहे. आरोपी प्रकाश गाडे आणि ती तरुणी यांचा पूर्व परिचय होता. त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुद्धा झाले होते. सी सी टी व्ही फुटेज मध्ये ती मुलगी आरोपीच्या मागे मागे चालत बस च्या दिशेने निघालेली दिसते आहे. परंतु या संदर्भातील एका महत्वाच्या मुद्द्याचा खुलासा होत नाही, तो म्हणजे जर हे संबंध परस्पर सहमतीने झाले असतील तर आरोपीने पळ का काढला ? आणि जर तो गुन्हेगार नसेल त्याने पोलिसांना शरण येणे का टाळले ??? थोडक्यात पूर्वपरिचित असूनही आरोपीने बलात्कार केला आहे हे सत्य आहे. परंतु अनोळखी पुरुषाने बलात्कार केला या पद्धतीचे वार्तांकन झाल्याने स्वारगेट बस स्थानकाच्या एकूणच सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते ते टळले आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यासंदर्भात एकंदरच समाजाची मानसिकता विचित्र आहे आणि याचा पिडीतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात राजकीय नेते आणि मिडीयाने केलेले वार्तांकन बघता अश्या गुन्ह्यांचे वार्तांकन कसे करावे , किंवा अश्या गुन्ह्यांच्या संदर्भात कोणती भूमिका घ्यावी या संदर्भात राजकीय नेते आणि मिडियाचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया युद्ध संपुष्टात यावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात रशियन शिष्टमंडळ आणि अमेरिकन शिष्टमंडळ यांच्यात सौदी अरेबिया मध्ये एक चर्चा झाली असून त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस इथे आमंत्रित केले गेले होते. परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात प्रचंड वादविवाद झाल्याचे वृत्त आले आहे. झेलेन्स्की यांना अमेरिकेने स्पष्ट शब्दात ठणकावले अमेरिकेने या युद्धात ३५० अब्ज डॉलर्स ओतले आहेत आणि म्हणून तुम्ही आजवर लढू शकत आहात अन्यथा हे युद्ध पहिल्या १५ दिवसात संपले असते. आम्ही मदत केली नाही तर तुम्ही टिकाव धरू शकत नाही. तुम्ही पुतीन यांचा प्रचंड तिरस्कार करता पण दुसऱ्या बाजूला सुद्धा कौतुक करावे असे काहीच नाही अर्थात तुमचे वर्तन सुद्धा आदर्श निश्चितच नाही आहे. त्यामुळे युद्धविराम आवश्यक आहे. युद्ध थांबल्यावर युक्रेनचे पुनर्निर्माण करण्यासाठी आम्ही निश्चितच सहाय्य करू परंतु तुम्ही आडमुठी भूमिका कायम ठेवली तर भविष्यात अमेरिका मदत करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी सज्जड दम दिला आहे परंतु झेलेन्स्की अहंकाराच्या आहारी जाऊन असेच वागत राहिले तर युक्रेन मध्ये सत्तांतर घडवून का होईना पण हे युद्ध थांबवले जाईल. कारण जागतिक शांततेसाठी आणि ट्रम्प यांच्या भविष्यातील योजनांसाठी ते आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राच्या प्रशासनात प्रेताच्या टाळूचे लोणी खाणारी प्रवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये भरलेली आहे आणि त्यांच्या या वृत्तीने शासनाचे आणि करदात्या नागरिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते आहे. नुकतेच एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दोघांच्या कर्तुत्वाची साक्ष देणारा समृद्धी महामार्ग बांधताना झालेल्या भ्रष्टाचाराने या मार्गाचे यश काळवंडणार का असा प्रश्न निर्माण होतो आहे. समृद्धी महामार्ग सेलू, जिंतूर आणि परभणी तालुक्यातून जात असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरून जाणार होता त्यांच्या जमिनीवरील वृक्षांचे मुल्यांकन करताना तब्बल १० पट मुल्यांकन केले गेले असून शेतकऱ्यांना १० कोटी नुकसान भरपाई देण्याऐवजी तब्बल १०० कोटी रुपये दिले गेल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी चौकशीचे आदेश दिले असून कृषी खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी सुरु आहे परंतु महसूल आणि कृषी असे दोन विभाग मिळून नुकसान भरपाई देतात त्यामुळे या प्रकरणात महसूल खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांचा पण बळी जाणार आहे. देवेंद्र फडणवीस विकास पुरुष म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सध्या १० मेगा महामार्गांचे काम सुरु आहे परंतु शासकीय कर्मचारी घुशीप्रमाणे शासकीय तिजोरीला पोखरून काढणार असतील तर या अतिरिक्त खर्चाचे ओझे टोलच्या रूपाने सामान्य नागरिकांनाच वाहावे लागणार आहे. म्हणून जनतेनेच आता जाब विचारणे आवश्यक आहे.
🔽





Comentários