🖋️ अभिजीत राणे लिहितात
“सैंया भये कोतवाल तो डर काहे का” असेच सध्या वाल्मिक कराड गात आहेत का ? असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत वाल्मिक कराड यांना अटक केली गेली आणि आज त्यांच्यावर खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे अशी बातमी सर्वत्र पसरली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज एक धक्कादायक बातमी सुद्धा उघड झाली आहे. संतोष देशमुख कुटुंबियांना एक निनावी पत्र प्राप्त झाले असून त्या पत्रात वाल्मिक कराड यांना तुरुंगात नियमबाह्य सवलती दिल्या जात आहेत इतकेच नाही तर नुकतीच त्यांनी तुरुंगात मटण पार्टीचा आस्वाद घेतला असल्याचा दावा सुद्धा केला जातो आहे. यापत्रामुळे संतापलेल्या संतोष देशमुख कुटुंबीयांनी तुरुंग व्यवस्थापनाकडे वाल्मिक कराड यांना अटक केलेल्या तुरुंगातील कक्षाचे सी सी टी व्ही फुटेज मागितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का ? असा प्रश्नच विचारण्याची आता वेळ आली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बलात्कारासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आपण बोलताना भान बाळगले पाहिजे इतके तारतम्य महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्यांना नसावे हे खरच खेदजनक आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलेने बलात्कार होताना प्रतिकार किंवा आरडाओरडा केला नाही असे भाष्य महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे. सामान्यतः अत्याचार होणारी स्त्री ही आपल्या अब्रू रक्षणाचे प्रयत्न करताना आरोपीशी झटापट करणे, आरडाओरडा करणे अशी कृत्य करते. परंतु प्रत्येकच स्त्री अश्या घटनेला सामोरे जाताना प्रतिकार करेलच असे संभवत नाही असेच मानस शास्त्रज्ञांचे मत आहे. बऱ्याचदा परिचित व्यक्ती अत्याचार करत असेल किंवा अकल्पित परिस्थितीत आरोपी अत्याचार करण्याचा प्रयास करत असेल तर या गोष्टीचा मानसिक धक्का प्रचंड मोठा असतो. आणि मानसिक धक्का बसलेली व्यक्ती थिजून जाते आणि प्रतिकार करत नाही हे सुद्धा नक्कीच संभवते. त्यामुळे केवळ प्रतिकार केला नाही किंवा आरडाओरडा केला नाही याचा अर्थ हे परस्पर सहमतीने झालेले संबंध आहेत असा तर्क करणे, किंवा बलात्कार झालाच नाही असा विचार करणे चुकीचे आहे. गृहराज्यमंत्रीपदावरील व्यक्तीकडून तरी अश्या संदर्भात संवेदनशील वर्तनाची अपेक्षा चुकीची नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जुन्या काळातील युद्धनीती वेगळी होती. किल्ल्यांना अत्यंत मोठे दरवाजे लावले असत. त्यावर खिळे लावलेले असत ज्यांना भेदणे सोपे नसे. मग हल्ला करणारा शत्रू हत्तीना दारू पाजून मदमस्त करणार आणि दारूच्या नशेत त्या हत्तीना दरवाज्याला धडक देण्यास उद्युक्त करणार. हत्ती दरवाजाला लावलेल्या खिळ्यांमुळे रक्तबंबाळ होऊन जात असत. पण शेवटी दरवाजा तुटून पडत असे आणि किल्ला काबीज होत असे. सध्या भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पडद्याआड युती करण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही हत्तींची गोष्ट आठवली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सीट्स ची मर्यादित ठेवणे असो किंवा उद्धव ठाकरे यांना नेस्तनाबूत करणे असो, या दोन्ही मजबूत दरवाजांना धडक द्यायला भाजपवाले मनसे नावाचा हत्ती वापरत आहेत. मोठेपणा आणि पक्ष जिवंत ठेवण्यासाठी लागणारा निधी या दोन लाभांसाठी मनसे ही हत्तीची भूमिका उत्तमरीत्या बजावत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही केवळ त्याच जागा लढवते किंवा लढवणार आहे त्या सर्व जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाविरुद्ध किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरूद्धच असतील आणि त्यामुळे भाजपला महाराष्ट्रावर एकछत्री अंमल स्थापन करणे सुलभ होईल. परन्तु या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अस्तित्वच पणाला लागते आहे याची पर्वा राज ठाकरे करत नाहीत हे खरच दुर्दैवी आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भाजपची केंद्रात राजवट येऊन ११ वर्ष झाली आहेत परंतु या ११ वर्षात सेन्सॉर बोर्ड या संस्थेवर देश आणि धर्माबद्दल अभिमान असणारी मंडळी बसवण्यात सरकारला अपयश आले आहे आणि त्यामुळे अर्थहीन , अश्लील , गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे पुष्पा सारखे चित्रपट बिनदिक्कत पास केले जातात आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावरील चल हल्ला बोल सारख्या चित्रपटाला परवानगी नाकारली जाते. हे प्रकरण इथेच थांबत नाही तर नामदेव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता आणि सेन्सॉर बोर्ड चित्रपट निर्मात्यांना कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारते. गोलपिठा या काव्य संग्रहातून ढसाळ यांनी दलितसमाजाच्या व्यथांना तोंड फोडले होते. हा त्यांचा सर्वाधिक प्रसिद्ध असा काव्यसंग्रह आहे परंतु सेन्सॉर बोर्ड या कविता संग्रहातील चित्रपटात दाखवलेल्या सर्व कविता काढून टाकणार असाल तरच चित्रपटाला परवानगी देऊ असा दम भरते. हे सगळे इथे थांबत नाही तर वाघ्या मुरळी नृत्य ही लोककला आहे हे सुद्धा सेन्सॉर बोर्डातील विद्वानांना माहिती नाही त्यांनी याचा उल्लेख स्टेज डान्स असे उल्लेखून त्याला सुद्धा काढून टाका असे सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डवरील सगळा कचरा काढून टाकल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे असे म्हणता येणार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित रहाणे चित्रपट अभिनेत्रींना त्रासदायक सिद्ध होते आहे. प्राजक्ता माळी या धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गेल्या होत्या. मध्यंतरी संतोष देशमुख खुनाच्या प्रकरणातील आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यात प्राजक्ता माळी चुकीच्या पद्धतीने चर्चेत आल्या. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांना त्र्यंबकेश्वर इथे शिवार्पणस्तु या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते. परंतु नंतर स्थानिक नागरिक आणि जुन्या विश्वस्तांनी प्राजक्ता माळी यांच्या शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाला आक्षेप घेतला. वादग्रस्त आणि सेलिब्रिटी असलेल्या मंडळीना आमंत्रित केल्याने धार्मिक कार्यक्रमाचे गांभीर्य संपुष्टात येते हा मुख्य आक्षेप होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून पोलिसांनी , स्थानिक प्रशासनाने आणि विश्वस्तांनी हा कार्यक्रम रद्द केला. प्राजक्ता माळी यांनी सुद्धा समजूतदारपणा दाखवत या कार्यक्रमातून माघार घेतली. या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या नादाला लागू नये हे सेलिब्रिटी मंडळींना समजले तरी उत्तम.
🔽





Comments